आगरी भाषा जतन करण्याचे प्रयत्न आवश्यक
By admin | Published: February 17, 2017 02:15 AM2017-02-17T02:15:44+5:302017-02-17T02:15:44+5:30
आगरी माणसाची संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांचा लढाऊ बाणा, त्यांची कलात्मकता सारे काही कोकणाशी नाते सांगणारे असल्याने
अलिबाग : आगरी माणसाची संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांचा लढाऊ बाणा, त्यांची कलात्मकता सारे काही कोकणाशी नाते सांगणारे असल्याने ठाणे, मुंबई व रायगड या तीन जिल्ह्यात वस्ती करून राहिलेला आगरी माणूस हा इथला भूमिपुत्र आहे. तरुणांनी जुनी संस्कृती जपली पाहिजे, आगरी भाषा दिवसेंदिवस लोप पावत आहे, ती जतन करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन आगरी बोली अभ्यासक व लेखक तथा आगरी कोषकार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पी.एन.पी. महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि वाङ्मय मंडळाच्या वतीने तीन दिवसांच्या आगरी बोली परिचय प्रमाणपत्र परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, वेगळेपण जपणारा आगरी समाज सर्व ठिकाणी विखुरलेला आहे. आगरी समाज आगरीपध्दतीच्या जेवणासाठी खूप प्रसिद्ध आहे. आगरी तरु णांनी जुनी संस्कृती जपली पाहिजे. समाजाशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे काम पीएनपी संस्था करत असते. आगरी समाजाने लग्न समारंभासाठी कर्जबाजारी होऊन थाटामाटात मुलांचा लग्न सोहळा करू नये, तसेच हळदी समारंभाला दारू, मटण ही आपली संस्कृती नाही. पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे करावा आणि चांगली प्रथा आगरी समाजात सुरू व्हावी असे नमूद केले. याप्रसंगी डॉ. अनिल बांगर, डॉ. गणेश अग्निहोत्री, संजीवनी नाईक, कैलास पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
आगरी बोली परिचय प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. मराठी भाषेचा उगम, मराठी भाषेतील विविध बोली, आगरी बोली, उगम, इतिहास, परिचय, व्याकरण, सांस्कृतिक संदर्भ, आगरी लोकसाहित्य, आगरी साहित्य आणि साहित्यिक अशा विशेष
अभ्यासक्रमाचे नियोजन केले होते.
कार्यक्र माचे सूत्रसंचालन वाङ्मय समिती प्रमुख प्रा. डॉ. ओमकार पोटे यांनी तर आभार मराठी विभागप्रमुख प्रा. नम्रता पाटील यांनी मानले.
या वेळी आगरी बोली संशोधक प्रा. डॉ. अनिल बांगर, पीएनपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, आगरी लेखक कैलास पिंगळे, उपप्राचार्या संजीवनी नाईक, मराठी विभाग प्रमुख नम्रता पाटील, वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. ओमकार पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)