बिरवाडी : महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतींमधील आंबेनळी सह्याद्रीवाडी त्या ठिकाणी घराला व जमिनीला तडे गेल्याने येथील कुटुंब सुरक्षित स्थळी हलविण्याचा आली आहे. कोथेरी जंगमवाडीमधील तीन कुटुंब रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत. माझेरी पारमाची या ठिकाणी जमिनीला व घराला तडे गेले आहेत. या सर्व ठिकाणच्या बाधित कुटुंबीयांची आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी भेट घेतली. त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता राज्य सरकारकडून मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे गोगावले यांनी या वेळी स्पष्ट केले.मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन तसेच घरांना तडे जाऊन सुमारे १०० कुटुंब बाधित झाली आहेत. त्यांना शासनाकडून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी या वेळी दिली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याची कारवाई सुरू आहे. तालुक्यात ज्या ठिकाणी जमिनीला, रस्त्यांना तडे गेले आहेत, त्या ठिकाणांची पाहणी भूगर्भाच्या पथकांमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. नागरिकांनी भयभीत न होता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन या वेळी गोगावले यांनी केले.महाड तालुक्यातील रस्ते व घाट यांचे नुकसान झाल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. शेतीचे पंचनामे सुरू असून नागरिकांना मदतीसाठी असलेल्या जाचक अटी-नियम बदलण्यात यावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी महाड एमआयडीसीमध्ये नुकसानी झालेल्या कारखान्यांचीही भेटी देऊन नुकसानाची पाहणी केली आहे.बाधित कुटुंबीयांना आर्थिक मदतबिरवाडी : महापुरांमध्ये महाड तालुक्यातील लाडवली येथील बंधू चव्हाण यांच्या तीन म्हशी पुरामुळे मृत्युमुखी पडल्या. त्यांना आमदार भरत गोगावले यांनी व्यक्तिगत १५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे, तसेच शिरसावणे येथील संतोष साळेकर यांचे घरही पावसामुळे पडले, त्यांनाही आर्थिक मदत करण्यात आली.
स्थलांतरितांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न - भरत गोगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 2:04 AM