जागरूक नागरिकांमुळे चोर अटकेत
By admin | Published: October 1, 2015 11:45 PM2015-10-01T23:45:02+5:302015-10-01T23:45:02+5:30
माणगांवमधील जागरूक नागरिक गणेश ठाकरे व दाजी कदम यांच्या समयसूचकतेमुळे सराईत मोटारसायकल चोरास गजाआड करण्यात माणगांव पोलिसांना यश आले आहे.
अलिबाग : माणगांवमधील जागरूक नागरिक गणेश ठाकरे व दाजी कदम यांच्या समयसूचकतेमुळे सराईत मोटारसायकल चोरास गजाआड करण्यात माणगांव पोलिसांना यश आले आहे.
माणगांवमधील एका नागरिकाची मोटारसायकल (क्र.एमएच ०६, बीएच ५३३३) ही जुने माणगांव काळ नदीच्या पुलाजवळून २७ सप्टेंबरला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास चोरीस गेल्याबाबत तक्रार माणगांव पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याच्या तपासात फिर्यादी यांच्या परिचयाचे माणगांवचेच रहिवासी गणेश ठाकरे व दाजी कदम यांना निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत ही मोटारसायकल दिसली. याबाबत त्यांनी चौकशी केली असता, मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्याने ते आणण्याकरिता कोणीतरी माणूस मोटारसायकल उभी करुन गेल्याचे त्यांना समजले. या माणसाबाबत त्यांनी पेट्रोल पंपावर जावून चौकशी केली असता, एक माणूस गाडीकरिता पेट्रोल घेण्याकरिता बाटली घेवून आल्याचे दिसले. त्यास ठाकरे व कदम त्यांनी गोड बोलून मोटारसायकलजवळ आणले व या प्रकाराची माहिती माणगांव पोलिसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.आर.पेंदाम, पोलीस हवालदार ए.व्ही. सुद, पोलीस नाईक आर.बी. म्हात्रे यांनी तत्काळ येवून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीने अनेक मोटारसायकल चोरल्या असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याने, मोटार चोरीचे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता माणगांव पोलिसांनी व्यक्त केली आहे.
(विशेष प्रतिनिधी)