ड्रेझर्सद्वारे वाळू उपशावर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:01 AM2018-01-18T01:01:10+5:302018-01-18T01:01:10+5:30
सावित्री खाडीमध्ये ड्रेझर्सच्या साहाय्याने करण्यात येणारा वाळू उपसा आणि वाहतुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी या परिसरावर
महाड : सावित्री खाडीमध्ये ड्रेझर्सच्या साहाय्याने करण्यात येणारा वाळू उपसा आणि वाहतुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी या परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येईल, अशी ग्वाही महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत दिली.
महाड येथील छावा मराठा योद्धा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुद्दीसर पटेल यांनी ड्रेझर्सद्वारे करण्यात येणारा भरमसाठ वाळू उपसा, त्याची अनधिकृतरीत्या बार्जेसद्वारे करण्यात येणारी वाहतूक आणि या प्रकाराकडे महसूल विभागाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षाविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी इनामदार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला तहसीलदार चंद्रसेन पवार,अव्वल कारकून जगदाळे यांच्यासह मुद्दीसर पटेल, हातपाटी वाळू व्यावसायिक फैसल चांदले आदी उपस्थित होते.
शासनाने जरी या दोन ड्रेझर्सना परवानगी दिली असली तरी शासनाने घातलेल्या २९ अटींपैकी एकाही अटीचे पालन ड्रेझर चालकांकडून केले जात नसल्याचा आरोप करीत, त्यांच्यावर देखरेखीसाठी महसूल खात्याचा एकही अधिकारी नसतो. त्यामुळे त्या रॉयल्टीवर अधिकाºयांची सही व शिक्का होत नाही. त्यामुळे एका रॉयल्टी पावतीवर दहा - दहा खेपा घातल्या जातात, असा आरोप हातपाटी वाळू व्यावसायिकांनी या बैठकीत केला. वाळूच्या ठिकाणी सीसी कॅमेरे नाहीत, असलेच तर ते बंद असतात. तसेच एका बार्जला ५० ते ६० ब्रासची परवानगी असताना २७५ ब्रास वाळू काढली जात असल्याचा आरोपही यावेळी हातपाटी वाळू व्यावसायिकांनी केला.
आम्ही ४०० स्थानिक हातपाटी वाळू व्यावसायिक आहोत तर चार ड्रेझरवाले हे बाहेरील आहेत. शासन या धनदांडग्यांना पाठीशी घालून गरीब व्यावसायिकांवर अन्याय करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महाड तालुक्यानून माणगावला वाळू न्यायची असली तरी परवानगी काढतात. मात्र, ड्रेझरवाले म्हसळा तालुक्यात वाळू काढतात आणि ४० किमी. अंतर पार करीत महाड तालुक्यात वाळूचे डम्पिंग करतात. त्यांच्याकडे कोणती परवानगी आहे, असा प्रश्नही या हातपाटी वाळू व्यावसायिकांनी उपस्थित केला. महत्त्वाच्या मागण्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्याने आपण आपले उपोषण तूर्तास
स्थगित करीत असल्याचे पटेल यांनी सांगितले.