- मधुकर ठाकूर
उरण : उरण शहरातील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान संचलित सीबर्ड (स्वीकार) असलेल्या या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सणासाठी रंगीबेरंगी, आकर्षक राख्या बनविल्या आहेत. उरण शहरात स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान संचलित विशेष मुलांची शाळा आहे. या शाळेत विशेष मुले दरवर्षी रक्षाबंधनाच्या सणासाठी आकर्षक राख्या बनवून विक्री करतात.या राख्या युईएस शाळा, सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल , उरण कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय,लिटील मास्टर आणि पालक या राख्या खरेदी करून विद्यार्थी , संस्थेच्या मदतीसाठी हातभार लावतात. विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या या राख्यांचे अनेक प्रकार आहेत. गोंडा , खड्यांची , मोत्यांची असे अनेक राख्यांचे प्रकार असतात. तीन रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंत किंमतीच्या राख्या येथे उपलब्ध असतात. शाळेच्या पर्यवेक्षक माधुरी उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश म्हात्रे, मानसी पांचाळ, पल्लवी परदेशी, साक्षी दांडेकर , प्रशांत कदम, गणेश जाधव, ,अस्मिता भोईर , आदी शिक्षक मुलांना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत.