राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: अलिबाग समुद्रकिनारी ए टी व्ही बाईक वरील अल्पवयीन चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना रविवारी २८ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. या अपघातात एटीव्ही बाईक स्वांराने पर्यटकांना घेऊन उंटाला धडक दिली. या अपघातात उंटासह बाईक वरील पर्यटक पडला आणि उंट उसळला. या अपघातात पर्यटकांना काही प्रमाणत दुखापत झाली असली तरी याबाबत कुठेही चर्चा झाली नाही की गुन्हाही दाखल झालेला नाही आहे. अपघाताचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अपघाताचा प्रकार समोर आला आहे. ए टी व्ही बाईक अपघाताच्या घटना सतत घडत असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच उपस्थित होत आहे. याबाबत स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन हे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र तयार झाले आहे.
अलिबाग समुद्रावर पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती. समुद्रकिनारी पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध जलक्रीडा, घोडा, उंट सफारी सह एटीव्ही बाईक चा आनंद पर्यटक लुटत होते. अलिबाग समुद्रावर एटीव्ही बाईक चालक हे अधिकतर अल्पवयीन मुले आहेत. समुद्रावर गर्दी असताना हे चालक वाटेल तशी बाईक चालवून स्वतच्या आणि पर्यटकांच्या जीवाशी खेळत असतात. गर्दीमधून बाईक चालवताना सुरक्षेचे नियम पाळत नाही. तसेच बाईकला असलेल्या मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर मुळेही पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो.
रविवारी २८ जानेवारी रोजी समुद्रकिनारी पर्यटक हे मौज मस्ती करीत होते. त्यावेळी एका अल्पवयीन एटीव्ही बाईक चालक दोन प्रवाशांना रपेट मारत होता. चालक हा बाईकच्या एकदम कडेला बसून वाहन चालवत होता. त्याचवेळी चालकाचे नियत्रंण सुटून पुढे उभा असलेल्या उंटाला जोरदार धडक दिली. या धडकेत बाईक वरील प्रवासी खाली पडून वाहन ही पलटी झाले. तर उंट ही पडला. त्यानंतर उंट उठून पर्यटकाला घेऊन सैरा वैरा पळू लागला. या अपघातामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या अपघाताबाबत कुठेही चर्चा झाली नाही. त्यामुळे प्रकरण दाबले गेले काय अशी चर्चा निर्माण झाली आहे.
अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणे हा गुन्हा आहे असे असताना समुद्रकिनारी असलेल्या एटीव्ही बाईकवर बहुतांशी अल्पवयीन मुले दिसतात. अनेकदा समुद्रकिनारी एटीव्ही बाईक द्वारे अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र तरीही ना पोलीस, ना मेरी टाईम बोर्ड ना स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत आहेत. पर्यटकांची सुरक्षा ही प्रशासनाची आणि समुद्रावर व्यवसाय करणाऱ्याची आहे. असे असताना अपघाताच्या घटनांमुळे पर्यटकांची सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे चित्र तयार झाले आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.