निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: वाहतूक पोलीस हा कायमचाच साऱ्यांच्या टिकेचा धनी असतो. त्याने शिस्त दाखवली तरी त्याच्यावर टीका आणि त्याने कोणावर कारवाई न करता सोडून दिले तरी त्याने चिरीमिरी घेतल्याची टीका. पण वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा त्यांच्या कार्यातून दिसुन येतो. असाच एक प्रामाणिकतेचा परिचय अलिबागेत वाहतूक पोलिसांनी समाजापुढे आणला आहे. पर्यटाचे हरविलेले पैशांचे पाॅकीट परत करीत पोलिस रक्षकअसल्याचे दाखवून दिले आहे.
अलिबाग वाहतूक युनिटमध्ये बायपास येथे आपले कर्तव्य बजावित असलेले पोलिस अंमलदार संदिप अव्हाड यांना रस्त्यावर पडलेले एक पाॅकेट मिळाले. या पाॅकेटमध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड, आर.सी बुक यासह 15 हजार रुपयांची रोख रक्कम होती. पाॅकेट मध्ये असलेल्या कागदपत्रावरून कुणाल लबडे याचे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याचा मोबाईल नंबर नसल्याने संपर्क होणे अवघड झाले होते. पयत्नांची पराकाष्ठा करीत पोलिस अंमलदार संदिप अव्हाड यांनी कुणाल लबडे यांचा मोबाईल नंबर शोधून काढला व रोख रकमेसह सर्व कागदपत्र त्याला दिली. यातून पोलिसांच्या प्रामाणिपतेचे ज्वलंत उदाहरण पहावयास मिळाले.