- विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील नांदगाव उपआरोग्यकेंद्र बांधून चार वर्षे झाली तरी आजतागायत डॉक्टरअभावी या उपकेंद्राच्या इमारतीला टाळेच आहे. नांदगाव पंचक्रोशीत तोरंकेवाडी, फणसवाडी, गोमाशी, पोटलज, दिघेवाडी, गोंडाळे, म्हसेवाडी, खरबाची वाडी, गोकूळ वाडा या सात आदिवासीवाड्या येथे पाच ते सहा हजार वस्ती आहे. येथील नागरिकांना नांदगाव येथील उपकेंद्र बंद असल्याने उपचारासाठी १५ किलो मीटर अंतरावर असलेल्या पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी यावे लागत आहे.पालीत येऊनही डॉक्टर उपलब्ध नसल्यास खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. यातही खासगी दवाखान्यात भरमसाठ फी घेतली जात आहे, यामुळे मोठा आथिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नांदगाव पंचक्रोशीत कोणतेही उद्योग नसल्याने आर्थिक क्षमता वाढविण्याचे साधन नाही. शेतीत पिकविलेले धान्य विकून उपचार घेणे भाग पडत आहे. अशा वेळी शासन आरोग्यकेंद्रावर कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र, याचा गोरगरीबास लाभ मिळत नाही. खासगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी सावकाराकडून व्याजदराने रक्कम घ्यावी लागते, अशी या विभागात गंभीर परिस्थिती आहे.या नांदगाव पंचक्रोशीतील जनतेसाठी कायम डॉक्टर मिळावेत, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे, नाहीतर आठवड्यातून तीन वार डॉक्टर आले तरी चालतील. नांदगाव उपआरोग्यकेंद्र सुरू करा, कारण नांदगाव पंचक्रोशी डोंगराळ असल्याने सर्प, विंचू जास्त प्रमाणात आहेत. शेतकऱ्याला शेतीत काम करत असताना सर्प, विंचूदंशला सामोरे जावे लागत आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध नसल्याने अलिबाग रुग्णालयात जावे लागत आहे. यासाठी पालीमध्येही औषधे उपलब्ध करा, अशी मागणी केली जात आहे.नांदगाव उपआरोग्य केंद्र बांधून चार वर्षे झाली, तरी आजपर्यंत बंद असल्याने येथील नागरिकांना उपचारासाठी तालुक्याच्या मुख्य ठिकाणी जावे लागते. मग ही इमारत काय कामाची?- योगेश शिंदे, नांदगाव ग्रामस्थउपआरोग्य केंद्रात डॉक्टरची पोस्ट नसते; परंतु सीएचओ पोस्ट ही उपआरोग्य केंद्रात तयार करण्यात येणार आहे. मात्र, ट्रेनिंग चालू असल्याने सहा महिने त्याची ट्रेनिंग झाल्यावर त्यांना पोस्टिंग देण्यात येणार आहे.- डॉ. ए. व्ही. मुळे, वैद्यकीय अधिकारी, खवली
नांदगाव उपकेंद्राला डॉक्टरांअभावी टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:16 AM