भूसंपादन करूनही मोबदला देण्यास टाळाटाळ, शेतातून टाकली रिलायन्स गॅस पाइपलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 02:11 AM2018-01-07T02:11:44+5:302018-01-07T02:12:18+5:30
गॅस पाइपलाइनसाठी जमिनीचे संपादन करून त्याठिकाणी पाइपलाइन टाकण्यात आली असली, तरी संबंधित शेतक-याला अद्यापि मोबदला दिला नसल्याचे उघड होत आहे.
नागोठणे : गॅस पाइपलाइनसाठी जमिनीचे संपादन करून त्याठिकाणी पाइपलाइन टाकण्यात आली असली, तरी संबंधित शेतक-याला अद्यापि मोबदला दिला नसल्याचे उघड होत आहे. कंपनीकडून जमिनीचा मोबदला मिळत नसेल तर संबंधित पाइपलाइन काढून टाकावी, अन्यथा सात दिवसांत मोबदला द्यावा, अशी मागणी सीताराम घासे यांनी केली आहे, अन्यथा शेतात सहकुटुंब बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही घासे यांनी दहेज - नागोठणे इथेन पाइपलाइन प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
विभागातील झोतीरपाडा येथील सीताराम तान्हू घासे यांची सर्वे नं.९१/३ ही जमीन रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनसाठी घेण्यात आली आहे. जागा संपादित करताना घासे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, या जागेतून पाइपलाइन टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी किशोर लैला व देविदास अडविले यांनी १ नोव्हेंबर १७ ला संपर्ककरून बाधित क्षेत्राचे सीमांकन करणे, प्रति गुंठा ५ लाख रु पये देणे, जमीन पूर्ववत करून बांधबंदिस्ती बांधून देणे, पाइपलाइनग्रस्त दाखला देऊन रिलायन्स कंपनीत नोकरी देणे आदी अटी त्यांच्यापुढे मांडल्याचे घासे यांनी सांगितले.
झोतीरपाडा येथील सर्वे नं. ९१/३ या जमिनीचा पंचनामा करून साडेचार गुंठे जमीन हस्तांतरित करण्यात येत असल्याचे सांगून पंचनाम्यावर सह्या घेतल्या. इतकेच नव्हे तर घासे यांचा मुलगा चंद्रकांतला शेतात उभे करून सर्वे नं. ९१/३ नावाची पाटी दिली व फोटो काढले आणि बाधित क्षेत्राची रक्कम धनादेशाद्वारे मिळेल असे सांगितले. या ठिकाणी पाइपलाइन टाकण्याचे काम झाल्यानंतर प्रत्यक्षात सात गुंठे जमीन बाधित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ७ गुंठ्यानुसार ३५ लाख रक्कम येणे अपेक्षित असतानाही पावणेदोन महिने उलटूनही मोबदला मिळालेला नाही.
मोबदला मागितल्यानंतर टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे सहकुटुंब उपोषण करणार असल्याचे निवेदन त्यांनी पालकमंत्री प्रकाश महेता, आ. प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी, जिल्हा पो. अधीक्षक (अलिबाग), उपविभागीय अधिकारी (पेण), तहसीलदार(पेण) आणि नागोठणे पोलीस ठाणे यांना पाठविण्यात आले आहे.