गोरेगावमधील उजव्या सोंडेचा जागृत पोवळ्या गणपती
By admin | Published: June 13, 2017 02:54 AM2017-06-13T02:54:30+5:302017-06-13T02:54:30+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोणेरेपासून तीन किमी अंतरावर असलेल्या गोरेगाव शहरास नवसाला पावणाऱ्या तब्बल १०३ वर्षांच्या प्राचीन पोवळ्याच्या गणपतीमुळे एक
- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोणेरेपासून तीन किमी अंतरावर असलेल्या गोरेगाव शहरास नवसाला पावणाऱ्या तब्बल १०३ वर्षांच्या प्राचीन पोवळ्याच्या गणपतीमुळे एक अनोखी परंतु फारशी कुणाला माहीत नसलेली ओळख आहे. पोवळ्यातील ही गणेशमूर्ती संपूर्ण राज्यातील एकमेव गणेशमूर्ती असल्याने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याची माहिती गोरेगावमधील ७१ वर्षांचे गणेशभक्त प्रफुल्ल खुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘पोवळे’ अर्थात यास प्रवाळ असेही म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्यास ‘विद्रुम’, हिंदीमध्ये ‘मूँगा’ तर इंग्रजीमध्ये त्यास ‘रेड कोरल’असे म्हटले जाते. पोवळ्याला जगभर दागिन्यांसाठी मोठी मागणी आहे. भारतातील प्रचलित समाजांमध्ये प्रवाळाचे मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी महत्त्व सांगितले जाते. दागिन्यांमध्ये वापरले जाणारे प्रवाळ किंवा पोवळे हे साधारणपणे लाल रंगाचे असते. प्रवाळ मिळवण्यासाठी समुद्रात खोल जावे लागते.
गोरेगावमधील श्री अमृतेश्वरी गायत्री देवी मंदिराच्या समोरच असलेल्या दीपमाळेच्या पायथ्याला या अत्यंत मौल्यवान मानल्या जाणाऱ्या पोवळ््याच्या उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना गोविंद लक्ष्मण शास्त्री रानडे यांनी केल्याची माहिती खुळे यांनी दिली. मुळात श्री अमृतेश्वरी गायत्री देवीची स्थापना गोविंद लक्ष्मण शास्त्री रानडे यांनी तब्बल १०३ वर्षांपूर्वी १९०४ मध्ये वैशाख शुद्ध सप्तमी शके १०२६ रोजी केली. त्यानंतर लगेच येणाऱ्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या पोवळ््याच्या गणपतीची स्थापना त्यांनीच केल्याचे खुळे यांनी सांगितले. पोवळ््याचा हा उजव्या सोंडेचा गणपती अत्यंत जागृत देवस्थान असून, तो नवसाला हमखास पावणारा गणपती असल्याचे खुळे यांनी सांगितले.
गोरेगाववासीयांचे श्रद्धेचे दैवत
दररोज पूजाअर्चा करण्याकरिता येथे पुजाऱ्यांची व्यवस्था आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या गणपतीचा उत्सव साजरा करण्यात येतो. गोरेगाववासीयांच्या श्रध्देचे दैवत असणारा हा पोवळ््याचा गणपती आतापर्यंत प्रसिद्धपासून फार दूर राहिला आहे.
मात्र ज्या-ज्या गणेशभक्तांना याबाबतची माहिती आणि प्रचितीचे अनुभव समजतात असे गणेशभक्त शोध घेत येथे दर्शन आणि नवस करण्याकरिता पोहोचतात असे खुळे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील १०३ वर्षांच्या प्राचीन पोवळ्याच्या उजव्या सोंडेची गणेशमूर्ती.