कर्जत : दिशा केंद्र संचालित रायगड चाइल्ड लाइन ही संस्था लहान मुलांसाठी काम करीत असते. कर्जत बाजारात आठ ते दहा वर्षांच्या लहान मुली भीक मागत होत्या. त्यांना कार्यालयात आणून समुपदेशन केले आणि पुढील शिक्षणाची व्यवस्था केली आहे.दिशा केंद्र संचालित व केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय अनुदानित रायगड चाइल्ड लाइन संपूर्ण रायगड जिल्ह्यात कार्यरत आहे. तरी ० ते १८ वयोगटांतील मुलांसाठी ही संस्था कार्यरत आहे. २३ डिसेंबर रोजी चाइल्ड लाइनचे कार्यकर्ते कर्जतला बाजारासाठी गेले असता त्यांना दोन लहान मुली भीक मागताना दिसल्या. त्या मुलींचे वय साधारण आठ ते दहा वर्षे आहे. या दरम्यान रायगड चाइल्ड लाइन टीम मेंबर यांनी प्रसंगावधान दाखवून त्या मुलींना ताब्यात घेतले.त्या मुलींना कार्यकर्त्यांनी दिशा केंद्र कार्यालयात आणून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना शिक्षणाबद्दल व त्या जे आजतागायत भीक मागण्याचे अपकृत्य करत आहेत, ते किती चुकीचे आहे, हे समजून सांगण्यात आले. यावेळी त्या मुलींकडून घरचा पत्ता घेऊन खोपोली येथे तत्काळ जाऊन त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यात आली.
पालकांकडे सुपूर्दमुलांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना मुलींना शिक्षण देण्यासंबंधी सांगण्यात आले. मुलींना त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या कार्यात रायगड चाइल्ड लाइन समन्वयक वैष्णवी दभडे, दिशा केंद्राच्या माधुरी कराळे, रेखा भालेराव, अनिता देशमुख, जगदीश दगडे व राम मस्के यांनी मोलाचे सहकार्य केले.