पेण : रायगड जिल्हा हागणदारीमुक्त घोषित झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचयतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे यासंदर्भात जिल्हा परिषदेमार्फत सूचना देण्यात आल्या होत्या. स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग यावर लक्ष ठेवून होता. स्वच्छतेमध्ये सातत्य राखणाऱ्या व परिसर स्वच्छ ठेवणाºया ११३ ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली असून द्वितीय क्रमांक सावरसई तर तृतीय क्रमांक तरणखोप या ग्रामपंचायतीला मिळाला आहे.वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच गोरखनाथ पाटील व सदस्यांनी हा पुरस्कार जि. प. अध्यक्षा आदिती तटकरे व शेकाप आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते स्वीकारला.रायगड जिल्हा स्वच्छ भारत अभियानात अव्वल राहण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या टीमवर्कने याकामी प्रचंड मेहनत घेतली असल्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंखे यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक घरामध्ये शौचालय उभारण्यासाठी जनतेचे समुपदेशन केले. त्यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे.स्वच्छता अभियान जिल्ह्यातील ८०७ ग्रामपंचयतींनी राबविले. यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल १ कोटी ५७ लाखांची पारितोषिकांची खैरात करून यामधील ११३ ग्रामपंचायतींना तालुकानिहाय २०१७-१८ मधील पारितोषिके देऊन सन्मानित केलेआहे.जिल्ह्यातील ५९ गटामधील ग्रामपंचायतींनादेखील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. २०१७-१८ मधील जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये माणगाव तालुक्यातील चांदोरे प्रथम, रोहा तालुक्यातील रोठ बु. द्वितीय तर उरणमधील धुतुम ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. विशेष पुरस्कारामध्ये म्हसळा तालुक्यातील फळसप ग्रामपंचायतीला कुटुंब कल्याण स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार मिळाला आहे. तर महाड तालुक्यातील फाळकेवाडी पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापनाचा वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला आहे.२०१७-१८ मधील पेण तालुक्यातील वाशी ही खारेपाटातील ग्रामपंचायत असून स्वच्छ भारत अभियानात तालुक्यातून प्रथम क्रमाकांची मानकरी ठरली आहे. याचबरोबर पेणमधील सावरसई, तरणखोप, करंबेळी आराव, अंतोरे व आमटेम या ग्रामपंचायतींनासुद्घा स्वच्छ अभियानात गटनिहाय पुरस्कार मिळालेले आहेत.>पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढली असून ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रभागनिहाय नागरिकांनी स्वच्छतेचे पालन करून ओला व सुका कचरा घंटागाडीतच टाकावा. लोकांचा सहभाग असल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाल्यापासून याचे सर्व श्रेय वाशी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील नागरिकांना देत आहे.- गोरखनाथ पाटील,सरपंच, वाशी, पेणअलिबाग तालुक्यातील अंबेपूर ग्रामपंचायतीला सामाजिक एकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जिल्हास्तरीय ग्रामपंचायतीमध्ये २०१८-१९ मध्ये चिंचवली ग्रामपंचायत ता. माणगाव प्रथम पुरस्काराचे मानकरी तर जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार पनवेल तालुक्यातील चावणे ग्रामपंचायतीला मिळाला आहे. महाड तालुक्यातील पारमाची ग्रामपंचायत तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:32 AM