ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रातून मतदारांमध्ये जनजागृती; पुढील काही दिवस सुरू राहणार मार्गदर्शन
By निखिल म्हात्रे | Published: March 6, 2024 09:26 PM2024-03-06T21:26:27+5:302024-03-06T21:26:38+5:30
लोकसभा निवडणुकीसाठीची प्रशासकीय पातळीवरची तयारी निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: लोकसभा निवडणुकीसाठीची प्रशासकीय पातळीवरची तयारी निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी तालुका प्रशासन कामाला लागले आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून गावागावात जनजागृती सुरु करण्यात आली आहे. पुढील काही दिवस ती सुरू राहणार आहे.
अलिबाग तहसील कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्राद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 800 हून अधिक मतदारांनी या केंद्राला भेट दिली आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापत असले तरी दुसरीकडे निवडणूक विभाग तयारीला लागले आहे.
लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. ईव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्ही पॅट मशीनदेखील जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत जनजागृती करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले. मतदान करण्यापासून, मतदान केल्यावर कोणाला मतदान केल्याची माहिती मतदारांना कशी मिळणार आहे. याबाबत प्रात्यक्षिकांद्वारे सांगण्याचे काम तालुका स्तरावर सुरु केले आहे. अलिबाग येथील तहसील कार्यालयात प्रात्यक्षिक केंद्र सुरु केले आहे.
अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अजित टोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. रामराजचे मंडळ अधिकारी आर.एम. मांढरे, रेवदंड्यातील तलाठी संजय शिंगे, रामराजचे तलाठी पी.एस. थोरात, थळचे तलाठी मयूर नाईक यांची याठिकाणी निवड केली आहे. तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मतदार या प्रात्यक्षिक केंद्राला भेट देत आहेत. यातून मतदारांपर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईव्हएम स्वतःची कार्यक्षमता आणि स्थिती याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. तसेच नागरिकांचे अभिप्राय घेऊन त्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन करण्यात येत आहे.