लक्ष्मीच्या आराधनेसाठी ‘को जागर्ति’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:45 AM2017-10-05T01:45:00+5:302017-10-05T01:45:50+5:30
भारतातील प्रत्येक सण ऋतुमानातील बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. शरद ऋतूच्या आगमनाने वातावरणात एक प्रसन्नता असते. आकाश स्वच्छ होऊन चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश थेट जमिनीवर येतो.
भारतातील प्रत्येक सण ऋतुमानातील बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. शरद ऋतूच्या आगमनाने वातावरणात एक प्रसन्नता असते. आकाश स्वच्छ होऊन चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश थेट जमिनीवर येतो. हवेत हळूहळू गारवा वाढू लागतो. चंद्र व चांदण्यांच्या शीतल, शांत किरणांची अनुभूती कौजागिरी पौर्णिमेच्या दिवशी येते. शेतकरी तयार पिकांची कापणी करून, नव्या पिकाची म्हणजेच, भाताच्या कणसांच्या दाण्यांची पूजा या दिवशी करतात. हा उत्सव महाराष्ट्राबरोबर पश्चिम बंगाल, ओडिसा व गोव्यामध्येही साजरा केला जातो.
अश्विन पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला अध्यात्मिक महत्त्व असून, या दिवशी करण्यात येणाºया व्रताला ‘कोजागिरी व्रत’ असेही म्हणतात. या दिवशी लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. लक्ष्मी प्रसन्न व्हावी, तिचा वरदहस्त लाभावा म्हणून मोठ्या उत्साहाने तिची आराधना करतात. याबाबत अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत.
या दिवसाबाबत अशी आख्यायिका आहे की, उत्तररात्री साक्षात लक्ष्मी देवी पृथ्वीवर येऊन ‘को जागर्ति’ ( म्हणजे, कोण जागत आहे) असे विचारते. त्यामुळे या दिवसाला ‘कोजागिरी पौर्णिमा’ असेही म्हणतात. लक्ष्मीच्या स्वागतार्ह रस्ते, घर, मंदिर, उद्यान आदी ठिकाणी दिवे लावले जातात.
महाराष्ट्रात लक्ष्मीची विधिवत पूजा करून आटीव दुधांचा नैवेद्य बनवून तो चंद्राला दाखवितात. त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ घालतात. चंद्राची पूजा करून त्या दुधात त्याचे प्रतिबिंब बघून त्यानंतर कुटुंबीय तो नैवेद्य प्राशन करतात. उत्तररात्री लक्ष्मी आगमन होत असल्याने तिच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी दिवे लावले जातात. जेणेकरून घरात तिने प्रवेश करून ते घर धनधान्यांनी समृद्ध राहते, अशी श्रद्धा आहे.
राजस्थानात या दिवशी स्त्रिया शुभ्र वस्त्रे परिधान करून चांदीचे दागिने घालतात. राजपूत रात्री चंद्राची पूजा करून ब्राह्मणांना शर्करायुक्त दूध देतात.
बंगाली राज्यात ‘लोख्खी पूजा’ या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. देवी लक्ष्मीची सेवा केली जाते.
गुजरातमध्ये अश्विन पौर्णिमेला ‘शरद पूनम’ म्हणून संबोधले जाते. गरबा आणि दांडिया रास हे पांरपरिक नृत्य खेळून, रात्रीचा जागर करून, भक्तिभावाने शरद पूनम साजरी करतात.
गोव्यात हा दिवस ‘नवे’ उत्सव म्हणून साजरा होतो. रात्री चंद्राची पूजा करून आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. त्यामुळेच या पौर्णिमेला ‘कौमुदी’ असे म्हणतात. कौमुदी म्हणजे चंद्राचे शुभ्र चांदणे. चंद्राला नैवेद्य दाखवून सहकुटुंब एकत्र येऊन गप्पा, गाणी, खेळ खेळून रात्रीचा जागर केला जातो. देवी-देवतांच्या मंदिर परिसरात दीप लावून कोजागिरीनिमित्त दिव्यांच्या प्रकाशात आणि चंद्राच्या शीतल चांदण्यांत विधिवत लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते.
ओडिसा राज्यात ‘कोजागराह’ या नावाने अश्विन पौर्णिमा साजरी केली जाते. घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून दारात रांगोळी काढली जाते. देव्हाºयातील देव स्वच्छ करून घरासमोर ठेवले जातात. त्यानंतर मूर्तीची विधिवत पूजा करून देवासाठी लोणी, बत्ताशे, पायस आदी गोड पदार्थ पानावर वाढून ते देवांना अर्पण करतात. पौर्णिमेच्या रात्री त्या देवांच्या मूर्ती तिथेच ठेवून रात्रभर जागर करतात.
रीना चव्हाण