दुर्धर आजाराच्या तपासणीसाठी ‘आयुष्मान भव’ योजनेचा शुभारंभ
By निखिल म्हात्रे | Published: September 7, 2023 08:25 PM2023-09-07T20:25:16+5:302023-09-07T20:26:52+5:30
आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोहीम यशस्वी राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अलिबाग - आरोग्य विभागामार्फत सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यात ‘आयुष्मान भव’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. आयुष्मान भव मोहीम 31 डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक समुदाय, आरोग्य अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सभा घेऊन आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोहीम यशस्वी राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एक सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणाऱ्या आयुष्मान भव मोहिमेंतर्गत सर्व वयोगटातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्यविषयक तपासण्या करण्यात येणार आहेत. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा, गर्भपिशवी मुखाचा, स्तनाचा कर्करोग तसेच सिकल सेल आजार या दुर्धर आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याबरोबरच 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची जन्मतः व्यंग व इतर दुर्धर आजारांसाठी तपासणी करण्यात येणार आहे.
कार्ड वितरीत करणार -
आयुष्मान आपल्या दारी 3.0 या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्याची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच सर्व नागरिकांचे आभा कार्ड काढण्यात येणार आहे. आयुष्मान सभा उपक्रमाद्वारे आरोग्यविषयक सेवा सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने घेण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, लसीकरण, क्षयरोग, कुष्ठरोग, आयुष्मान कार्ड व आभा कार्ड या सर्वांची जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्हात ‘आयुष्मान भव’ मोहिमेचा शुभारंभ झाला असून, 31 डिसेंबरपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. अंगणवाडी, प्राथमिक शाळेतील मुलांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. सदर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल याकडे लक्ष दिले जाईल.
- डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.
आयुष्यमान भव मोहिमेत मुलांच्या 32 सामान्य आजाराची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यकता असल्यास या मुलांच्या जिल्हास्तरावर तसेच नोंदणीकृत खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यांना आवश्यक उपयुक्त साहित्यदेखील देण्यात येणार आहे.
- डॉ. मनीषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.