मुरुड : मुरुड शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली असून, पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यास स्थानिकांना उत्पन्नाचे स्रोत वाढण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. मुरुडला पर्यटनाचा ब दर्जा हा महाविकास आघाडी सरकार असल्यामुळेच मिळणार आहे. विकासकामात आपण कोणतेही राजकारण करणार नाही. मुरुडचा विकास व्हावा, यासाठीच पर्यटनाच्या ब दर्जाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मुरुड येथे केले आहे.
एकदा का दर्जा प्राप्त झाला की, राज्य व केंद्रातील सर्व पर्यटन योजना आणण्यास खूप मदत होणार आहे. मुरुड नगरपरिषदेने पर्यटन विभागाकडून आलेल्या पत्राची लवकरात लवकर पूर्तता करावी, जेणेकरून काम लवकर मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. मुरुड नगरपरिषदेला पर्यटन विभागाकडून ब दर्जा प्राप्त होण्यासाठी काही बाबींची पूर्तता करण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे.
या बाबी पूर्ण करण्यासाठी नगरपरिषदेला कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेण्यासाठी मुरुड नगरपरिषदेच्या सभागृहात नगरसेवकांसमवेत एक सभा खासदार तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी सभागृहात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अतिक खतीब, प्रभारी मुख्याधिकारी गोविंद कोटंबे, गटविकास अधिकारी संजय चव्हाण, नगरसेवक मनोज भगत, आशिष दिवेकर नगरसेविका आरती गुरव, रिहाना शहाबंदर, नगरसेवक अविनाश दांडेकर, माजी नगरसेवक संजय गुंजाळ, माजी नगरसेविका प्रमिला माळी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थितहोते.
अनेक समस्यांचा वाचला पाढा : उपस्थितांनी विजेची भरमसाठ बिले, खराबरस्ते, भंडारी समाजाचे माडीच्या दाखल्यांविषयी मुदतवाढ मिळावी, तसेच मुरुड शहरातील बंदर रोड परिसरातील व अन्य भागात रखडलेली पाणीपुरवठा पाइपलाइन याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने इस्टिमेंट बनविण्याचे तटकरे यांनी आदेश दिले.
च्मुरुड येथील विद्युत मंडळातर्फे शहरातील अंडर ग्राउंड वीज वाहिनीचे काम अपूर्ण राहिल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्याबद्दल तटकरे यांनी थेट अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधून तातडीने नगरपरिषदेत नगरसेवकांची भेट घेऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. मुरुड शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नगराध्यक्ष यांच्या अपरोक्ष बोलणे उचित होणार नाही, असे स्पष्ट मत तटकरे यांनी व्यक्त केले.मुरुड समुद्र किनारा सुशोभीकरणासाठी अर्थसंकल्पात ३० कोटींची तरतूद केली असून, कोरोना निवळल्यानंतर याही निविदा निघणार असल्याचे त्यांनी संकेत खा.तटकरे यांनी दिले.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीही या पर्यटनस्थळी उत्तमोत्तम पद्धतीने किनारा सुशोभीकरण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केल्याचे सांगितले. कोरोना काळात समस्त मुरुडकर जनतेनी सामाजिक अंतर, मास्क आणि हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब कटाक्षाने करावा, असे सांगितले.