अलिबाग - जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून इलाजासाठी येणाऱ्या बालकांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये उपचार केले जात आहेत. परंतु, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी असणाऱ्या बेडच्या संख्येमुळे आणि लांबच्या प्रवासामुळे रायगडकरांना आपल्या बाळावर उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने जिल्ह्यातील चार उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विशेष नवजात बालकांसाठी केअर युनिट उभारण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.
व्यवस्थापनाने एसएनसीयू उभारण्यासाठी प्रस्ताव शासनाला सादर करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरु केली आहे. रायगड जिल्ह्यात कर्जत, पनवेल, माणगाव, श्रीवर्धन या तालुक्यांमधील जन्मदर अधिक आहे. त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालयापासून हे चारही तालुके किमान 80 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहेत. यामुळे बालकांच्या आजारावरील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात येणे शक्य होत नाही. तर, दुसरीकडे खासगी रुग्णालयात पदरमोड करून जावे लागत आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय व्यवस्थापनाने पनवेल, कर्जत, माणगाव आणि श्रीवर्धन या ठिकाणी असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात विशेष नवजात बालकांसाठी केअर युनिट उभारण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयात बालकांचा कक्ष आहे. त्यामध्येच विशेष नवजात बालकांसाठी केअर युनिट उभारण्यात आले आहे. या युनिटमध्ये जिल्ह्यातून बालरुग्ण उपचारासाठी दाखल होतात. जिल्ह्यात अन्य चार ठिकाणी एसएनसीयु युनिट सुरु झाले तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना नजीकच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी बालकाला घेऊन जाणे सोयीस्कर होणार आहे. त्याचबरोबर बालकांच्या पालकांचा वेळ व पैसे वाचणार आहे. या चारही उपजिल्हा रुग्णालयांमध्ये असणाऱ्या स्ट्रक्चरचा वापर केला जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात एसएनसीयु सेंटर सुरु आहे. याला संलग्न असणारे अजून चार एसएनसीयू सेंटर पनवेल, कर्जत, माणगाव आणि श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे.- डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय.