शासकीय सर्वेक्षण : युवक-युवतींची मतदार नोंदणीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 02:15 AM2020-11-26T02:15:07+5:302020-11-26T02:15:21+5:30
शासकीय सर्वेक्षण : जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील १ लाख जणांचे यादीत नाव नाही
अलिबाग : रायगड जिल्ह्यात निवडणूक विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या मतदार नोंदणी अभियानाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. शासकीय सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील जवळपास १ लाख युवक-युवतींनी आपली मतदार यादीत नोंदणी केलेली नाही. दुसरीकडे स्थलांतरित मतदार आपली मतदार यादीतील नावे वगळण्यास इच्छुक नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
रायगड जिल्ह्यात २३ लाख ७०१ मतदारांमध्ये अपंग मतदारांची संख्या ८ हजार ७८९ इतकी आहे. १८ ते १९ वयोगटातील २८ हजार ५७४ मतदार आहेत तर २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या ४ लाख ३४ हजार ७८७ इतकी आहे. निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणी वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. जनजागृती मोहीम राबविली जाते. युवा मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी शाळा तसेच महाविद्यालय स्तरावर निवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा स्थापन केली आहे. शिवाय मतदार नोंदणी साक्षरता दिंडी काढली जाते.
महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीपसारखा कार्यक्रम राबविला जातो. परंतु जिल्ह्यात नवमतदार नोंदणीला मिळणारा प्रतिसाद खूपच कमी आहे. निवडणूक विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात जवळपास १ लाख नवीन मतदार आहेत. त्यातील किमान ५४ हजार मतदारांची नोंदणी होणे अपेक्षित आहे; परंतु तसा प्रतिसाद मिळत नाही. दुसरीकडे स्थलांतरित मतदार आपली नावे स्वतःहून मतदार यादीतून कमी करीत नाहीत. पूर्वी ही नावे संबंधित अधिकारी कमी करीत असत; परंतु आता ते अधिकार कमी करण्यात आले आहेत. अशा मतदारांची यादी राज्य निवडणूक आयोगाला पाठविली जाते.
मतदार याद्यांच्या पुनर्रीक्षण मोहिमेचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मतदार याद्या अद्ययावत, अचूक व्हाव्यात तसेच जास्तीतजास्त पात्र मतदारांची नावे मतदार यादीत यावीत, यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. नागरिकांनीदेखील यात सहकार्य करावे. आपली तसेच आपल्या नातेवाइकांची नावे यादीत योग्य पद्धतीने नोंदविली गेली आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.
- निधी चौधरी, जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड
रायगडमध्ये आता मतदार याद्यांचे पुनर्रीक्षण करण्यात येत आहे. यात नवीन मतदार नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार
१ जानेवारी २०२१ रोजी ज्यांचे वय
१८ वर्षे पूर्ण झालेले असेल अशा व्यक्तींना मतदार यादीत आपले
नाव नोंदविता येणार आहे.
त्यानुसार जुनी मतदार यादी १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात
आली आहे.
१५ डिसेंबरपर्यंत या यादीवरील दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. नवीन मतदार नोंदणी किंवा नावे वगळणे, दुबार नावे कमी करणे, पत्ता बदलणे यासाठी ५ व ६ डिसेंबर तसेच १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. १४ जानेवारीपर्यंत यादीची तपासणी, अद्ययावतीकरण, छपाई करून १५ जानेवारीपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.