महाड : छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. ‘बहुजन हिताय- बहुजन सुखाय’ या त्यांच्या विचारातूनच देश पुढे गेला पाहिजे, असे प्रतिपादन नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.किल्ले रायगडावर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ (पुणे) आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या ३४२ वी शिवपुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, समितीचे अध्यक्ष रघुजी आंग्रे आदी उपस्थित होते. यावेळी सिंधिया यांनी आपण पाहुणे नसून या मातीमधलाच एक असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवा आणि समर्पण या दोन गुणांचा अवलंब केल्यास देशाचे कल्याण होईल, असे सांगितले. मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यांत असून शौर्य, बलिदान, आणि वीरता असलेला इतिहास असल्याचे सांगितले.नौसेना उभी करून समुद्रतटाचेही रक्षण कसे करावे हे दाखवून दिले. महाराजांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्या विविध आरमारात वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना सामावून घेत स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांच्या या विचाराचे आचरण केल्यास देशाचे कल्याण होईल, असेही स्पष्ट केले. यामुळेच महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांना कुळवाडीभूषण ही संबोधले होते तर बडोद्याचे गायकवाड आणि कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोळ्यांसमोर ठेवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनादेखील शिक्षणाला चालना दिली होती, असे सांगितले.
श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराचे झाले वितरणसमितीच्या वतीने देण्यात येणारा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर व इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना देण्यात आला, तर विशेष सत्कार सैन्यदल अधिकारी व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार यांचा सपत्नीक करण्यात आला. यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांच्या वंशजांचा सत्कारही केला. शिवरायमुद्रा आणि शिवऋषींची शिवसृष्टी या ग्रंथांचे प्रकाशनदेखील करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.