लोकमत न्यूज नेटवर्ककासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून आठ महिन्यांपूर्वी दोन साधू व चालक यांची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणात एकूण ५४ आरोपींचा गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला, तर अटक करण्यात आलेल्यांपैकी उर्वरित लोकांच्या अर्जावर जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावातर्फे गैरसमजातून तिघांची हत्या करण्यात आली होती. दोन साधू आणि त्यांचा ड्रायव्हर हे गुजरातमधील सुरत येथील आपल्या गुरूच्या अंत्यदर्शनासाठी जात होते. रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना ग्रामस्थांनी संशयातून या तिघांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात हत्येत सामील असल्याचे दाखवून जवळपास दोनशेहून अधिक जणांवर संशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे. गुरुवारी संध्याकाळी पालघरचे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी ५४ आरोपींची १५-१५ हजारांच्या जामिनावर सुटका केली आहे.
या प्रकरणात आरोपींतर्फे वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी बाजू मांडताना म्हटले की, या आरोपींची सदर घटनेत कोणतीच भूमिका नव्हती. त्यांना फक्त संशयाच्या धाग्यावर अटक केली होती. या वेळी मयत साधूंच्या कुटुंबीयांच्या बाजूने वकील पी.एन. ओझा यांनी बाजू मांडली, तर या घटनेतील अन्य आरोपींच्या जामीनअर्जाबाबत येत्या ५ डिसेंबर रोजी निकाल देण्यात येईल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. गडचिंचले येथे चोर समजून १६ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. दोन साधू कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज व त्यांचा चालक नीलेश तेलवडे यांची रात्री जमावाने हत्या केली होती. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ठपका ठेवून कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे आणि हवालदार नरेश धोंडी यांना सेवेतून सक्तीची सेवानिवृत्त घेण्याची आणि इतर १५ पोलीस कर्मचारी यांना काही वर्षे मूळ वेतनावर ठेवण्याची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांनी केली होती. उर्वरित लोकांच्या अर्जावर जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
जातीय रंग देण्याचाही प्रयत्न गडचिंचले येथे घडलेल्या या हत्याकांडाचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते. या प्रकरणाला जातीय रंग देण्याचाही प्रयत्न काही लोकांनी केला होता. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचीही मागणी करण्यात आली होती.