जिल्हाधिकारी कार्यालयांवर बैलगाडी मोर्चा
By admin | Published: February 15, 2017 04:52 AM2017-02-15T04:52:06+5:302017-02-15T04:52:06+5:30
शासनाने आवश्यक त्याठिकाणी निवडणूक काळातही निवडणूक आयोगाच्या परवानगीने अध्यादेश काढले आहेत. मात्र हे सरकार
अलिबाग : शासनाने आवश्यक त्याठिकाणी निवडणूक काळातही निवडणूक आयोगाच्या परवानगीने अध्यादेश काढले आहेत. मात्र हे सरकार आचारसंहितेचे कारण दाखवून अध्यादेश काढण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बैलगाडी शर्यत सुरू करण्याचा अध्यादेश काढावा, अथवा आचारसंहिता संपल्यानंतर अध्यादेश काढण्याचे लेखी स्वरूपात द्यावे, अन्यथा गनिमी काव्याने हजारोंच्या संख्येने बैलगाड्या घेऊन मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा आक्र मक इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी दिला आहे.
रायगड जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीला विशेष मान आहे. परंपरा जपण्यासाठी प्रत्येक शेतकरी धडपडत आहे. त्यामुळे शेकापच्या माध्यमातून रायगड बाजार येथून बैलगाड्यांसह शेकापच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. मराठी अस्मिता जपत आ. जयंत पाटील यांनी बैलगाडी स्वत: हाकत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला होता.
आ.पाटील पुढे म्हणाले, राज्य शासन रेसकोर्सवर भांडवलदारांना पैसा उडविण्याची मुभा देत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या परंपरेवर, तसेच त्यांच्या हौशीवर आडकाठी निर्माण करीत आहे. प्राणी संरक्षण संघटनांनी अटी घालून बैलगाडी शर्यतीला मान्यता द्यावी, अन्यथा शेकापक्ष अधिक आक्र मक भूमिका घेईल. अलिबाग हे पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. बैलगाडी शर्यतीदेखील सुट्यांच्या कालावधीत आयोजित केल्या जात असल्याने पर्यटकांचा ओघ वाढत आहे. बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी शेकापचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आ.पाटील यांनी स्पष्ट केले.
बैलगाडी शर्यतीसाठी प्राणी संरक्षण संस्था तसेच राज्य शासनाने बैलगाडी संघटनांबरोबर चर्चा करावी. त्यांनी सूचित केलेल्या अटी बैलगाडी हौशींना मान्य असतील, मात्र बैलगाडी या पारंपरिक खेळावर बंदी मान्य केली जाणार नाही. त्यामुळे पुढच्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक विचार करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, अन्यथा गनिमी काव्याने मंत्रालयावर धडक मोर्चा काढू. यामध्ये शासनाने तुरु ंगात टाकले तरी मागे हटणार नाही, असा इशारा आ. जयंत पाटील यांनी दिला आहे.
अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आ. पंडित पाटील, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा परिषद सदस्य अॅड. आस्वाद पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, अनंतराव देशमुख आदींसह बैलगाडी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(विशेष प्रतिनिधी)