नागोठणे : काही वर्षांनंतर खा. सुनील तटकरे यांच्या रूपाने खासदारपद मिळाले आहे. त्यांची कन्या सध्या राज्य मंत्रिमंडळात सुद्धा आहे. पक्षात आणि राज्य सरकारमध्ये त्यांचे वजन आहे. मात्र, रायगड जिल्ह्यात पैसे का येत नाहीत, नेतृत्व कुठे तरी कमी पडत असल्यामुळेच, रायगडावर राज्य सरकारचे कायम दुर्लक्षच होत असल्याचा आरोप मनसेचे नेते, माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला.मनसेचे नेते बाळा नांदगावकर रविवारी नागोठणे दौऱ्यावर आले होते. या प्रसंगी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारच्या सध्याच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का? असा प्रश्न विचारला असता, राज्य सरकारकडून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नसल्यामुळे ते कृष्णकुंजवर येऊन आपले गाऱ्हाणे मांडत असतात व आम्ही त्यांना निश्चितच न्याय देत असतो. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतच असतो. नागोठणे परिसरातील जेएसडब्ल्यू, जिंदाल या मोठ्या कंपन्यांमध्ये मराठी तरुणांना न्याय मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न हातात घेतला पाहिजे. स्थानिक नेत्यांनी सर्वांची त्यासाठी मदत घेणे गरजेचे आहे. पास्को या कंपनीवर काढलेल्या मोर्चात मी स्वतः सहभागी झालो होतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
रायगडकडे सरकारचे कायमच दुर्लक्ष, बाळा नांदगावकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 6:56 AM