बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धरले जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर

By राजेश भोस्तेकर | Published: November 8, 2022 03:22 PM2022-11-08T15:22:12+5:302022-11-08T15:22:51+5:30

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दोन महिलांना त्वरित उपचार न मिळाल्याने दोघींचीही बाळे दगावल्याची धक्कादायक घटना घडली.

Balasahebnchi Shiv Sena office bearers kept the district surgeon on edge | बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धरले जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर

बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धरले जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर

googlenewsNext

अलिबाग : अलिबाग मधील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दोन महिलांना त्वरित उपचार न मिळाल्याने दोघींचीही बाळे दगावल्याची घटना सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि अतिरिक्त शल्यचिकित्सक यांच्यासह डॉक्टरांना जाब विचारून चांगलेच फैलावर घेतले. तसेच दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या सात महिन्यात जिल्हा रुग्णालयात ४९ बालके प्रसूती दरम्यान दगावली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक हे त्रास देत असल्याची तक्रार अनेकांनी यावेळी केली असून खुद्द अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनीही याला दुजोरा दिला आहे. दोन्ही अधिकारी यांची यावेळी शाब्दिक चकमक ही पाहायला मिळाली. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील शल्यचिकित्सक यांच्यातच एकोपा नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

सर्वसामान्य नागरिक हा खाजगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेत असतो. खाजगी रुग्णालयात प्रसूती खर्च हा परवडणारा नसल्याने अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात गरोदर महिला दाखल होतात. मात्र त्यांना उपचार देताना रुग्णालय प्रशासन तर्फे दिरंगाई होण्याच्या घटनाही घडत असतात. अलिबाग तालुक्यातील वायशेत आणि आवास येथील दोन महिला यांची स्त्रीरोग तज्ञ्ज डॉ. अनिल फुटाणे यांच्याकडे प्रसूती बाबत उपचार सुरू होते. सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी दोघींनाही प्रसूती कळा सुरू झाल्याने फुटाणे यांनी जिल्हा रुग्णालयात पाठविले. 

जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलाना वेळेत उपचार न मिळाल्याने त्याची बाळे दगावली. या घटनेची माहिती मिळताच मानसी दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. प्रसूती कक्षात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ प्रमोद गवई, डॉ अनिल फुटाणे तसेच त्यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांना दळवी यांनी विचारणा केली. यावेळी मानसी दळवी, राजा केणी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. दोषीवर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे. घटनेचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाईल, असे आश्वासन डॉ सुहास माने यांनी दिले. 

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कोणतेही लक्ष नसल्याचा आरोप मानसी दळवी यांनी केला आहे. खाजगी रुग्णालयातील उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने ते जिल्हा शासकीय रुग्णालयात येत असतात. मात्र याठिकाणीही रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. हलगर्जी पणामुळे कोणाचा जीव जात असेल तर कोणालाही सोडणार नाही असा इशाराही मानसी दळवी यांनी दिला आहे.

Web Title: Balasahebnchi Shiv Sena office bearers kept the district surgeon on edge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.