लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील बहुतांश शेतामध्ये खरीप हंगमाची लागवड सुरू आहे. कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग असल्याचे दिसून येते. शेतमजुरांची मजुरी वाढल्याने मजुरांची शाेधाशाेध करताना शेतकऱ्यांची दमछाक हाेत आहे. रब्बीचा हंगाम संपून आता शेतांमध्ये खरीपाची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने वाल, हरभरा, मुग, तूर, वाल-पापडी, कांदे, ताेंडली, टोमॅटाे, वांगी, काेबी, फ्लॉवर, मिरची यासह अन्य पिके घेतली जातात. शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचे क्षेत्र खूपच लहान असल्याने या ठिकाणी माेठ्या प्रमाणात शेतीयंत्राचा वापर केला जात नाही. मात्र काही ठिकाणी नांगरणीची कामे ट्रॅक्टरद्वारे करण्यात येतात. शेतीचा व्यवसाय सध्या आतबट्ट्याचा झाला आहे. शेतात राबणाऱ्या मजुरांसाठी सध्या मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक हाेताना दिसते. नवीन पिढीतील तरुण अशा कामांकडे वळत नसल्याने मजुरांची संख्या राेडावली आहे. जे मजुर उपलब्ध हाेतात त्यांनी मजुरी वाढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
शेती करणे आता आतबट्ट्याचा व्यवसायशेतामध्ये राबणाऱ्या मजुरांची कमतरता आहे. जे मजूर येतात त्यांच्या खाण्या-पिण्याची साेय करावी लागते. जुरीही वाढली आहे. त्यामुळे शेती करणे आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. फक्त कुटुंबासाठी लागणाऱ्या धान्यासाठी आता शेतीचा हाेत आहे, असे खंडाळे शेतकरी नंदू साेडवे यांनी सांगितले.शेतीचे क्षेत्र छाेटे आहे, त्यामुळे यांत्रिक पध्दतीने शेती करण्याचा प्रश्नच येत नाही. काही ठिकाणी नांगरणीसाठी ट्रॅक्टर आणण्यात येताे. उर्वरित शेतीची कामे मजुरांच्या जीवावरच करावी लागतात. मजुरीमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतीचा व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न पडताे, असे उमटेचे शेतकरी अनंत पुनर म्हणाले.शेती व्यवसाय करायचा का नाही असा प्रश्न आहे. सतत वाढणाऱ्या खतांच्या किंमती, महाग झालेले बियाणे, वाढत्या मजुरीचा दर यामुळे मेटाकुटीला आलाे आहाेत. पूर्वी एकमेकांच्या शेतात राबण्याची परंपरा हाेती, आता ती लाेप पावली आहे. मजूर मिळत नाही. त्यांची शाेधाशाेध करावी लागते. महागाईच्या काळात आर्थिक घडी विस्कटून जाते, असे सातघर येथील शेतकरी सचिन ठाकूर यांनी सांगितले.
कृषियंत्रांनी मजुरांची जागा घेतलेली नाहीजिल्ह्यातील प्रत्येकाच्या वाट्याला आलेले शेतीचे क्षेत्र हे छाेट्या प्रमाणात आहे. त्यामुळे कृषियंत्राचा वापर आजही अतिशय कमी प्रमाणात हाेताे. शिवाय शेतीचे ठिकाण हे बांधा-बांधाला लागूनच असल्याने त्या ठिकाणी ट्रॅक्टर पाेचणे कठीण आहे. मजुरांच्या मदतीनेच शेतीच्या मशागतीची कामे करण्यात येतात.