माणगाव : भिरा येथील देवकुंड धबधबा व एक किलोमीटर परिसरात प्रांताधिकाऱ्यांनी २१ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत पर्यटकांना येण्यास मनाई आदेश काढला होता. परंतु आता पर्यटनासाठी हे स्थळ खुले करण्यात आले आहे. माणगाव तालुक्यातील भिरा गावच्या हद्दीतील देवकुंड धबधबा हा पावसाळ्यात पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण होत आहे. मात्र तेथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने हा धबधबा सुरक्षीत नाही.
२०१७ च्या पावसळ्यात येथे चार पर्यटक वाहून गेले होते तर ५५ पर्यटक नदीपात्रात अडकले होते. सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्याच्या कालावधीत जिवीत आणि मालमत्ता हानी होऊ नये तसेच सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आले होते. आता ही मुदत १ नोव्हेंबरला संपल्याने देवकुंड पर्यटकांसाठी खुले केले आहे. डोंगरमाथ्यावर अजूनही परतीचा पाऊस पडत असल्याने देवकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक आतूर झाले आहेत. पाऊस संपला तरी हा धबधबा वर्षभर चालू राहतो यामुळे वर्षभर पर्यटकांची येथे गर्दी असते. स्थानिक गाईड, खानावळ, हॉटेल बंद पडले होते , परंतु पुन्हा हे व्यवसाय चालू होणार असल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.