चवदार तळ्यात पोहण्यास बंदी घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:12 AM2017-08-04T02:12:41+5:302017-08-04T02:12:41+5:30
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला त्या ऐतिहासिक चवदार तळ्यामध्ये पोहण्यास, तसेच या तळ्याच्या काठावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावण्यास नगरपरिषदेने बंदी करावी
महाड : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला त्या ऐतिहासिक चवदार तळ्यामध्ये पोहण्यास, तसेच या तळ्याच्या काठावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावण्यास नगरपरिषदेने बंदी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभाग अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, शहराध्यक्ष प्रभाकर खांबे, जिल्हा उपाध्यक्ष केशवराव हाटे, सरचिटणीस लक्ष्मण जाधव, अशोक मोहिते, जयराज जाधव, अशोक मोरे यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांची भेट घेवून याबाबत कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली. मागील आठवड्यात चवदार तळ्यात पोहताना एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. तसेच चवदार तळ्याच्या लगत डॉ. आंबेडकर चौकात खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावण्यात येत असल्याने, तसेच त्या ठिकाणी खाद्यपदार्थ जाणीवपूर्वक तळ्यात टाकले जात असून चवदार तळ्याची यामुळे विटंबना होत असल्याचे शिष्टमंडळाने सांगताना या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या नगरपरिषदेने त्वरित हटवाव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच तळ्याच्या दक्षिण बाजूला नियमितपणे पार्र्किं ग केलेली वाहने नगरपरिषदेने त्वरित हटविण्यात यावी, अशी मागणी देखील निवेदनात केली आहे.
तसेच तळ्याच्या दक्षिण बाजूला नियमितपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर नगरपरिषद आणि पोलिसांनी कारवाई करावी,अशी मागणी मोहन खांबे यांनी केली.