बंदीमुळे २५० कोटींची उलाढाल ठप्प
By admin | Published: November 30, 2015 02:23 AM2015-11-30T02:23:18+5:302015-11-30T02:23:18+5:30
चार महिन्यांपासून नाखवा आणि खलाशी यांच्यातील यांत्रिक बुमच्या (पावर ब्लॉक) वादात ससून डॉक बंदरातील जवळपास सत्तर टक्के पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.
मधुकर ठाकूर , उरण
चार महिन्यांपासून नाखवा आणि खलाशी यांच्यातील यांत्रिक बुमच्या (पावर ब्लॉक) वादात ससून डॉक बंदरातील जवळपास सत्तर टक्के पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिक आणि या व्यवसायावर आधारित असलेल्या लाखो कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. नाखवा आणि खलाशीवर्गातील वादामुळे चार महिन्यांत सुमारे अडीचशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. दोघांतील वादावर वेळीच तोडगा न निघाल्यास मच्छीमार व्यवसाय आर्थिक संकटात सापडण्याची भीती मच्छीमार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
मागील २५ वर्षांपासून पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय सुरू आहे. पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या हजारो मच्छीमारांवर सध्या मासेमारी व्यवसायच बंद ठेवण्याची पाळी आली आहे. याचे कारण नाखवा आणि खलाशी यांच्यातील वाद होय. या आधी पर्ससीन नेट मासेमारी करण्यासाठी मच्छीमार बोटींवर १८ खलाशी काम करीत असत. या पध्दतीमध्ये समुद्राच्या भूभागावर मासळी दिसली की वर्तुळात जाळी टाकून बांगडा, सुरमई, हलवा, टुना, शिंगाला आदी जातीची मासळी पकडली जाते. पर्ससीन नेट मासेमारीसाठी एकदा टाकलेली जाळी खेचण्यासाठी १८ खलाशांना तीन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळाच मासेमारी करणे शक्य होते. यावर उपाय म्हणून गेल्या वर्षी काही मच्छीमार नाखवा मंडळीने मच्छीमार बोटींवर बुम बसवून मासेमारी व्यवसायाला सुरुवात केली होती. यांत्रिक बुममुळे मच्छीमारांचा आर्थिक फायदाच होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारण दिवसातून दोन ते तीन वेळाच मासेमारी करणे शक्य होत असताना बुममुळे दिवसातून ८ ते १० वेळा मासेमारी करणे शक्य होऊ लागले. मासेही विपुल मिळू लागले.यांत्रिक बुममुळे खलाशांचीही मेहनत कमी झाली. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांनी यांत्रिक बुमलाच अधिक पसंती दिली आहे.
यांत्रिक बुमच्या अतिवापरामुळे मासळी उत्पत्तीवरही मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊ लागला. तसेच मासळी आवक वाढताच मासळीचे भावही घसरण्यास सुरुवात झाली. शिवाय जाळींचेही अधिक नुकसान होऊ लागले. बुमच्या अतिवापरामुळे आर्थिक नुकसानीच्याही बाजू समोर आल्या. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांनी मच्छीमार बोटींवर बुम न बसविताच मासेमारी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे खलाशीवर्ग दुखावला गेला आणि त्यांनी असहकाराची भूमिका घेतली.