कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घारापुरी बेटावरील महाशिवरात्री उत्सवावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:37 AM2021-03-10T01:37:09+5:302021-03-10T01:37:33+5:30
शासनाच्या आदेशाने यात्रा रद्द : शिवभक्तांची नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी ११ मार्च रोजी घारापुरी बेटावर भरविण्यात येणारा जागतिक महाशिवरात्रीचा उत्सव शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर घुमणारे बम...बम... भोलेचे सूर यंदा बेटावर घुमणार नाहीत.
मुंबईपासून अवघ्या ११ किमी अंतरावर असलेले घारापुरी बेट सहाव्या शतकातील प्राचीन शिवकालीन लेण्यांमुळे कायम जागतिक प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहे. काळ्या पाषाणात शिवाची विविध रुपे असलेली अनेक प्रचंड शिल्प आहेत. मोठ्या खुबीने कोरलेल्या शिल्पांमध्ये अर्धनारीश्वर शिव, कल्याणमूर्ती, अंधकासुरवध, गंगावतारण शिव, योगीश्वर उमामहेश्वरमूर्ती आणि २० फूट उंच महेशमूर्ती आदी शिल्पांचा समावेश आहे.
महाशिवरात्री निमित्ताने बेटावरील या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात. त्यामुळे घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्री म्हणूनही ओळखली जाते.
घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने हजारो शिवभक्त येतात. यामध्ये देशी -विदेशी पर्यटक आणि शिवभक्तांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. शिवदर्शनासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांमुळे बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्री म्हणूनही ओळखली जाते. बेटावर जाण्या-येण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया,जेएनपीटी,उरण-मोरा,न्हावा बंदरातून होड्या,लॉचेस,मचव्यांची सोय असते.
यावर्षी मात्र कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर घारापुरी बेटावर भरविण्यात येणाऱ्या महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यावर शासनाने प्रतिबंध घातले आहेत.
सागरी मार्ग बंदच
११ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त गेटवे ऑफ इंडिया,जेएनपीटी,उरण-मोरा,न्हावा बंदरातून घारापुरी बेटावर सागरी मार्गाने येणाऱ्या होड्या, लॉचेस,मचव्यांनाही सक्तीची बंदी घालण्यात आली आहे. शिवभक्त भाविकांनी शासनाने घातलेल्या बंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी भाविकांना केले आहे.