वाकण-खोपोली महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:27 AM2019-07-17T00:27:15+5:302019-07-17T00:27:20+5:30
वाकण-पाली-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ अ चे दुहेरीकरणाचे बांधकाम इपीसी तत्त्वावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत हाती घेण्यात आले
पाली : वाकण-पाली-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ अ चे दुहेरीकरणाचे बांधकाम इपीसी तत्त्वावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत हाती घेण्यात आले असून ते काम बेग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करीत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम अतिपर्जन्यवृष्टीमुळे अर्धवट राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तेथून अवजड वाहतूक करणे धोकादायक आहे. तसेच पाली येथील अंबा नदीवरील पूल हा जुना व जीर्ण झाला असल्याने यावरून अति अवजड वाहनांची वाहतूक झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो व दुर्घटना होऊ शकते. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी वाकण-खोपोली राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी करण्यात येत असल्याची अधिसूचना सोमवार १५ जुलै रोजी पाली-सुधागड तहसीलदार यांना दिलेल्या पत्राद्वारे काढली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मंत्रालयाने, वाकण-पाली-खोपोली हा रस्ता नवीन राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ अ मध्ये घोषित केला आहे. हा रस्ता २३ जून, २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास हस्तांतरित झाला असून, या रस्त्याचे दुहेरीकरणाचे बांधकाम इपीसी तत्त्वावर केंद्रीय मंत्रालयाच्या निदेशानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांच्या मार्फत हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थिती हे काम प्रगतीत असून काही ठिकाणी तात्पुरते वळण रस्ते दिलेले आहेत. परंतु सध्याच्या अति पर्जन्यवृष्टीमुळे हे वळण रस्ते काही ठिकाणी क्षतीग्रस्त झाले आहेत. तसेच सध्या सुरु असलेल्या पावसामुळे अंबा नदीवरील पाली येथील पुलावरून पावसाचे पाणी वाहते हा पूल जुना व जीर्ण असल्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक मुंबई-गोवा महामार्गाहून, पेण-खोपोली मार्गाहून वळविण्यात यावी अशी मागणी कार्यकारी अभियंता (रा.म) म.रा.र.वि यांनी लेखी पत्राव्दारे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे केली होती. त्या अनुषंगाने सद्यस्थिती जिल्ह्यात सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे तसेच पाली येथील अंबा नदी पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करून, ही वाहतूक मुंबई-गोवा महामार्गाहून पेण-खोपोली मार्गाहून वळविण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी पत्राद्वारे सबंधित विभागांना दिल्या आहेत.