बिरवाडी : शॉर्टसर्किटमुळे बँक आॅफ महाराष्ट्रच्या महाड तालुक्यातील बिरवाडी शाखेत आग लागल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली. बिरवाडी केसर कॉम्प्लेक्समधील तळमजल्यात बँक आॅफ महाराष्ट्रची बिरवाडी शाखा असून, या शाखेच्या विद्युत मीटरजवळ मेन स्वीचमध्ये शॉर्ट सर्किट झाले. यामुळे बँकेतील कागदपत्रांनी पेट घेतल्याने आग लागली. हा प्रकार स्थानिक नागरिक मधुकर मालुसरे, पारखी, नितीन साळुंखे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सतर्कता दाखवत या घटनेची माहिती तत्काळ महाड एमआयडीसी पोलिसांनी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नंदकिशोर सस्ते यांनी महाड एमआयडीसीमधील अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाचे अधिकारी एम. एम. सावंत, आर. डी. पाटील, फायर फायटर आर. जे. तडवी, आर. एस. दुडियार यांनी तत्काळ बँकेमध्ये प्रवेश करून रेतीने व अग्निशामक सिलिंडरच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले.बँक आॅफ महाराष्ट्रच्या बिरवाडी शाखेचा विद्युत मीटर हा बंदिस्त परिसरात असल्याने या ठिकाणी शॉर्ट सर्किटनंतर मदत कार्यास अडथळा निर्माण झाला होता. या घटनेनंतर १५ फेब्रुवारी रोजी बँक आॅफ महाराष्ट्रची ग्राहक सेवा बंद ठेवण्यात आली होेती, शॉर्टसर्किट कशामुळे झाले? याचा शोध घेऊन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक चंदन कुमार यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)
शॉर्टसर्किटमुळे बँके लाआग
By admin | Published: February 16, 2017 2:12 AM