ग्राहकांना कर्ज देण्यास बँका निरुत्साही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:21 AM2019-12-24T02:21:07+5:302019-12-24T02:21:36+5:30
दक्षिण रायगडमधील तरुणांची फरफट : शेतकरी, युवा, बचत गटांमधील महिलांमध्ये नाराजी
उदय कळस
म्हसळा : रायगड जिल्ह्यामधील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, महाड, पोलादपूर, महाड व माणगाव तालुक्यातील अनेक शेतकरी छोटा-मोठा उद्योग करण्यासाठी बँकाकडून मिळणाऱ्या कर्जावर अवलंबून असतात. राष्ट्रीयकृत बँकामार्फत, शेतकरी व युवकांना वेगवेगळे योजनांमधून कर्ज उपलब्ध करून देणे, ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असते, परंतु दक्षिण रायगडमधील काही तालुक्यांमध्ये अनेक बँकांकडून शेतकरी, युवक व बचत गटातील महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. वारंवार हेलपाटे मारूनही कर्ज उपलब्ध होत नसल्याने परिसरातील ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
परिसरातील तालुक्यांत शेळी पालन, कुक्कुट पालन, गाय व म्हैस पालन, दुबार पीक, शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, कर्ज उपलब्ध नसल्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले आहेत. उद्योग करण्यासाठी सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेले ग्राहकांनाही बँक कर्ज उपलब्ध करून देत नसल्यामुळे असंतोष पसरत आहे, तर काही बँका गरज नसताना अनेक कागदपत्रे जमा करण्यास सांगत आहेत. कागदोपत्री घोडे नाचवून वेळ काढू भूमिका काही बँकांनी घेतली आहे.
बँकामधून मुद्र्रा लोनसाठी अर्ज करून कर्ज उपलब्ध होत नाही, तसेच शासनाच्या विविध योजनांमध्ये आॅनलाइन अर्ज करूनही शासनातर्फे प्रकल्प मंजूर होऊनही बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नसल्यामुळे शासनाच्या अनुदानाचा लाभ शेतकरी व युवकांना होत नसल्याने ते अडचणीत आले आहेत.
म्हसळा व महाडमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यतिरिक्त नाबार्ड फायन्सशियल सर्व्हिस लिमिटेड बँकेने कार्यालय सुरू केले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होत होता, परंतु सध्या म्हसळा येथील कार्यालय बंद असल्यामुळे म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील शेतकºयांना नाबार्ड बँकेकडून कर्ज पुरवठा होत नाही.
शेती उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणे ही बँकांची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र बँकांकडून कर्ज देण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याने शेतकºयांमध्ये निरुत्साह आहे. या प्रकरणी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकºयांकडून होेत आहे.
म्हसळा येथील बँक आॅफ इंडिया शाखेत डेअरी, कॅटल डेअरी व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेण्यासाठी गेले होते. मात्र, बँक मॅनेजरने काहीही ऐकून न घेत कर्ज देऊ शकत नसल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील बेरोजगारांना कर्ज देत नसल्याचे त्यांनी सांगितले.
- बुशरा मुकादम,
सुशिक्षित तरुणी, पांगलोळी
म्हशी पाळण्यासाठी बँकेकडे कर्ज मागितले असता, स्पष्ट नकार देण्यात आला. शासन नोकºया देत नाही आणि उद्योगासाठी कर्जही मिळत नसल्याची खंत सतीश घोले या तरुणाने व्यक्त केली. तर दूध डेअरी व्यवसायासाठी अपेक्षित कर्ज देण्यास बँक कोणतेही सहकार्य करणार नसल्याचे संदेरीतील आखलाक हजवाने या तरुणाला सांगण्यात आले आहे.
व्यवसायासाठी कर्ज देण्यास कोणत्याही प्रकारचा नकार बँकांनी देऊ नये, ग्राहकाला सहकार्य करावे आणि मार्गदर्शन करण्यात यावे, असे बँक मॅनेजरला सांगितले आहे.
- आनंद निंबेरकर
(एल.एम.डी.)