महाडमधील बँकांना पुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:48 PM2019-08-08T23:48:13+5:302019-08-08T23:48:24+5:30
स्टेट बँकेची कॅश भिजली; चार दिवस व्यवहार राहणार बंद
दासगाव : महाड तालुक्यात पुराने हाहाकार माजवला आणि तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. पुराचे पाणी शहरात दाखल झाल्याने पुराच्या पाण्यात या बँका देखील सुटल्या नाहीत. महाडमधील राष्ट्रीयकृत बँका असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ इंडिया या दोन्ही बँकांची यंत्रणा पुराच्या पाण्यात भिजल्याने किमान चार दिवस या बँका बंद राहणार आहेत. यातील स्टेट बँक आॅफ इंडियाची किमान चार लाखांची कॅश भिजली गेली. बँक आॅफ इंडियाचे काही व्यवहार उद्या सुरू होतील, अशी माहिती दिली आहे.
महाड शहरात पुराच्या पाण्याने काही ठिकाणी पाच फुटांची पातळी गाठली होती. यामुळे दुकाने, बैठी घरे, जुन्या इमारतीमधील पहिला मजला यामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. शहरातील पूर ओसरल्यानंतर अनेकांना पैशाची गरज भासते. मात्र, महाडमधील स्टेट बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ इंडिया या दोन्ही राष्ट्रीयकृत बँका पाण्याखाली आल्या होत्या. यामुळे दोन्ही बँकांचे व्यवहार ठप्प झाले. बँकांमधील कागदपत्रे, संगणकीय यंत्रणा, एटीएम, प्रिंटर आणि फर्निचर आदी साहित्य भिजले गेले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियामधील सर्व सामान बाधित झाले असून जवळपास ४ लाख कॅश भिजली, तर पंधरा लॉकर, संगणकीय यंत्रणा बंद पडली आहे. यामुळे ही बँक आठवडाभर बंद राहण्याची शक्यता असल्याचे बँकेचे सर्व्हिस व्यवस्थापक महेंद्र कपडेकर यांनी सांगितले.
बँक आॅफ इंडियामधील कर्मचाऱ्यांनी बँकेतील काही सामान पाणी भरण्यास सुरवात होताच सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरवात केली, यामुळे बँकेतील काही यंत्रणा सुरक्षित राहिली. बँकेत किमान तीन फूट पाणी पातळी होती. यामुळे फर्निचर आणि कागदपत्रे पाण्यात बुडाली. बँक दोन दिवसातच पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता बँक अधिकारी सतीश पाडावे यांनी दिली. याचबरोबर महाडमधील मुरली मनोहर सहकारी बँकेच्या शिवाजी चौक शाखा तसेच अण्णासाहेब सावंत महाड को-आॅप. अर्बन बँकेत देखील पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
बँका सुरक्षित स्थळी कधी जाणार?
महाडमध्ये पूर हा प्रतिवर्षाचा आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर शासनाने काही निर्देश दिले होते. महाडमधील शासकीय कार्यालये, बँका सुरक्षित स्थळी किंवा किमान पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करणे आवश्यक आहे. मात्र, आजतागायत याबाबत बँका निष्काळजी राहिल्या आहेत. गेली अनेक वर्षे या बँका एकाच ठिकाणी आहेत. ज्या भागात पूर येण्याची अधिक शक्यता आहे अशा ठिकाणी या बँका असल्याने या पुरात देखील या बँका पाण्याखाली गेल्या. अद्याप बँका सुरक्षित स्थळी नेण्याबाबत कोणताच निर्णय बँक प्रशासनाकडून घेण्यात आला नसल्याची माहिती दोन्ही बँक अधिकाऱ्यांनी दिली.