रोजगार निर्मिती क्षेत्राचा पतपुरवठा बँकांनी वाढवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:06 AM2017-10-06T02:06:21+5:302017-10-06T02:06:49+5:30
विविध शासकीय योजनांतर्गत स्वयंरोजगार स्थापन करू इच्छिणाºया व त्याद्वारे रोजगार निर्मितीस वाव असणा-या क्षेत्राला बँकांनी पतपुरवठा वाढवावा, असे निर्देश गुरुवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
जयंत धुळप
अलिबाग : विविध शासकीय योजनांतर्गत स्वयंरोजगार स्थापन करू इच्छिणाºया व त्याद्वारे रोजगार निर्मितीस वाव असणा-या क्षेत्राला बँकांनी पतपुरवठा वाढवावा, असे निर्देश गुरुवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
रायगड जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. डॉ.सूर्यवंशी म्हणाले, ज्या ठिकाणी अर्थसाहाय्य करून रोजगाराला चालना मिळणार आहे, अशा ठिकाणी अर्थसाहाय्य त्वरित करावे. अशा प्रकरणांचा निपटाराही त्वरित करून संबंधित अर्जदाराला उत्तर द्यावे, जेणेकरून उदयोन्मुख उद्योजक नाराज होणार नाही याची बँक अधिकाºयांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात ग्रामप्रवर्तकांनी गावातील रोजगार निर्मितीसाठी गावातील काही लोकांना शेतीपूरक व स्थानिक उद्योगांसाठी प्रवृत्त केले आहे. अशा प्रकरणांबाबत मुदतीत व सकारात्मक निर्णय घ्यावा, जेणे करून स्थानिक लोकांना त्याच गावात रोजगार उपलब्ध होईल. बँकांनी स्वयंप्रेरणेने गावकºयांमध्ये अर्थसाहाय्य योजनांबाबत जागृती करण्यासाठी शिबिरे घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ.सूर्यवंशी त्यांनी व्यक्त केली.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे महाव्यवस्थापक मोहन सांगवीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.भोर, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, नाबार्ड रायगड जिल्हा समन्वयक एस.एस.रंगनाथन, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ए. नंदनवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक एम.एन. देवराज, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील, तसेच सेंट्रल बँक महाव्यवस्थापक पुनितकुमार, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक एस.आर.नलावडे, बँक आॅफ बडोदाचे व्यवस्थापक के. साई कृष्णन, बँक आॅफ इंडियाचे झोनल मॅनेजर सी.के.पराते, दयानंद कुंभार तसेच सर्व बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बँकांचा शासनपुरस्कृत योजनांचा अर्थसाहाय्य आढावा घेण्यात आला.