निघाले बाप्पा विदेशात, आकर्षक मूर्तींना आफ्रिकेत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:58 AM2018-08-26T03:58:48+5:302018-08-26T03:59:09+5:30
थायलंडचे भक्त पेणमध्ये : जेएनपीटी बंदरातून मूर्ती रवाना
पेण : भक्तांच्या लाडक्या बाप्पाचा उत्सव अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे पेणच्या दीपक कलाकेंद्रातून थायलंडच्या थाई समाजाच्या महिलांनी प्रत्यक्ष येऊन बाप्पाच्या पाच फुटी, आठ फुटी अशा मोठ्या मूर्तींची खरेदी केली. शुक्रवारीच जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे कंटेनरमधून या मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. तब्बल १८ दिवसांच्या प्रवासाअंती त्या थायलंडमध्ये दाखल होऊन गणेशोत्सव मंडपांमध्ये दाखल होणार आहेत. थाई समाजाच्या महिलांनी १५ मोठ्या बाप्पाच्या मूर्ती पेणमधील दीपक कलाकेंद्रातून खरेदी केल्या. बाप्पाच्या मूर्तीच्या देखण्या, आकर्षक रूपाने त्या अतिशय आनंदित झाल्या होत्या.
१३ सप्टेंबर गणेश चतुर्थीलाच थायलंडमध्ये गणेशोत्सव साजरा होतो. थायलंडमध्ये बाप्पाच्या मूर्ती तेथील कलाकार बनवितात. मात्र, त्या गणपतीच्या मूर्तींना पेणच्या कलात्मकतेचे साधर्म्य दिसून येत नाही. थायलंडमध्ये यापूर्वीही पेणच्या कार्यशाळेतून मूर्ती नेण्यात आल्या. मात्र, यंदा पहिल्यांदाच थाई महिला भारतात आल्या आणि त्यांनी गाइडच्या साहाय्याने पेणमध्ये येऊन पाच फुटी, आठ फुटी अशा मोठ्या मूर्तींची खरेदी करून शुक्रवारीच थायलंडला रवाना झाल्यात.
आफ्रिका खंडात २०० मूर्ती रवाना
च्२० दिवसांपूर्वी आफ्रिका खंडात सुद्धा २०० मूर्ती गेल्याचे मूर्तिकार दीपक समेळ यांनी सांगितले. यंदा अफ्रिका खंडातील टांझानिया येथे या गणेशमूर्ती अनिवासी भारतीयांनी नेल्या आहेत. च्ही पहिलीच आॅर्डर असल्याचे समेळ यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी परदेशातील मागणी वाढत असून वेळेअभावी ती पोहोच करणे शक्य होणार नाही; परंतु गणेशोत्सवाची शान व मान, सन्मान परदेशातही भक्तिभावाने होत असल्याचे समेळ यांनी सांगितले.