महिला मूर्तिकारांशी बाप्पा बोलतात डोळ्यांची भाषा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 11:47 AM2024-07-28T11:47:12+5:302024-07-28T11:47:17+5:30
महिला मूर्तिकार केवळ व्यवसाय म्हणून याकडे न पाहता वारसा म्हणूनच कला जोपासत आहेत.
माधवी पाटील, पेण : पेणमधील अनेक महिला मूर्तिकार, कारागीर गणेशमूर्ती साकारून, त्यांची सजावट करून त्यात जिवंतपणा आणत आहेत. घर-संसार सांभाळताना व्यवसाय, रोजगार म्हणून त्यांनी या कामाचा श्रीगणेशा केला असून, त्यांची ही कला जगभर नावाजली जात आहे. मूर्ती कलेचा वारसा जपणाऱ्या महिला मूर्तिकार केवळ व्यवसाय म्हणून याकडे न पाहता वारसा म्हणूनच कला जोपासत आहेत.
नृत्यांगना असणाऱ्या सोनाली कला केंद्राच्या सोनाली पवार यांचा मूर्तीची सजावट करण्यात हातखंडा आहे. डोळे, धोतर, फेटा, रंगकामाची त्यांची कला वाखाणण्याजोगी आहे. आजोबांचा वारसा त्या अविरतपणे चालवत आहेत.
सुगंधा पाटील-कळवे याही गणेशमूर्तींची रंगरंगोटी व बाप्पांची कलाकुसर करतात. साक्षात बाप्पांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले असून सजावट करताना कलाकार देहभान हरपून जातो, असे सुगंधा सांगतात. घर, संसार सांभाळून त्या हे काम करतात.
देवघर कला केंद्रातून सासऱ्यांचा कलेचा वारसा तेजल हजारे पुढे चालवत आहेत. डोळ्यांची आखणी, सजावट तेजल अशी करतात, की नजर मूर्तीवरून हटत नाही. या छटांमधून बाप्पा डोळ्यांची भाषाचं बोलतात, असे त्या आवर्जून सांगतात.