पेणमध्ये तांबड्या मातीच्या बाप्पाचा ‘श्रीगणेशा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 12:46 AM2021-03-12T00:46:28+5:302021-03-12T00:46:45+5:30
लाल मातीपासून इकोफ्रेंडली मूर्तींची निर्मिती
दत्ता म्हात्रे
लाेकमत न्यूज नेटवर्क
पेण : गावच्या परिसरातील डोंगर पठारावरील लालबुंद तांबडी माती सर्वकामी उपयोगी पडते. पूर्वी रंगकाम करण्यासाठी घरांच्या भिंती, काडवी बांबूंचे कुड जे इकोफ्रेंडली घरांसाठी भिंतीसारखे असत. या कुडांना शेणमातीचे लिंपण देऊन नंतर सफेद चुना, त्यावर या तांबड्या मातीचा रंगकाम म्हणून सर्रास वापर करीत असत. त्यानंतर आता या मातीपासून पेणच्या गणेश मूर्तिकारांनी चक्क गणेशमूर्ती साकारून इकोफ्रेंडली पर्यावरणपूरक अशा या मूर्तिकलेचा प्रारंभ केला आहे. या इकोफ्रेंडली मूर्तींना भविष्यात चांगले दिवस येतील, अशी भावना पेण शहरातील मूर्तिकार करीत आहेत.
मातीशी नातं हा जिव्हाळ्याचा विषय आहे. या मातीतून कला, क्रीडा बहरली. लाल मातीच्या आखाड्यात कुस्ती, क्ले कोर्टवर टेनिस, रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यती, क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेट खेळ, सर्व क्रीडा प्रकार मातीत बहरले, विस्तारले. त्यात तांबड्या मातीचा रंग व गंध वेगळाच. या मातीने मनोरंजन क्षेत्रातही चांगले नाव कमावले आहे. वारली पेंटिंगमध्ये लाल मातीचे रंग भरले ती माती पूर्वीपासून कुंभार समाज मातीची मडकी व गणेशमूर्ती बनवीत असत; पण शाडू माती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर सुरू झाल्यानंतर गावच्या डोंगर, पठारावरील लालबुंद तांबडी माती मूर्तिकार वापरनेसा झाले. पण पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली गणपती बाप्पांच्या मूर्तींची मागणी लक्षात घेऊन पेण महलमिया डोंगरावरील लाल तांबड्या मातीपासून बाप्पाची मूर्ती बनविण्याचे काम पेणचे मूर्तिकार दिलीप लाड यांच्या कार्यशाळेत सुरू आहे.
nतांबडी माती चाळून वस्त्रगाळ करून पाण्यात भिजवून मळली जाते. त्यानंतर साच्यात लोण्यासारखे मातीचे गोळे दाबत त्यातून गणेशमूर्ती साकारली जाते. पाण्याने याला फिनिशिंग देत सुंदर मूर्ती तयार केली जाते.
nअतिशय नाजूक व हळुवारपणे या पद्धतीने या मातीच्या गणेशमूर्ती तयार करून इकोफ्रेंडली मूर्तीची निर्मिती तयार होत असल्याने पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर लगेचच पाण्यात विरघळत असल्याने ती गणेशभक्तांच्या पसंतीस पडेल, असे मूर्तिकार दिलीप लाड यांनी म्हटले आहे.