शाळेच्या भिंतीजवळ बार, मात्र अधिकारी म्हणतात अंतर ८५ मीटर
By वैभव गायकर | Published: March 15, 2024 09:50 AM2024-03-15T09:50:42+5:302024-03-15T09:51:12+5:30
शाळेपासूनच्या अंतरावरून उत्पादन शुल्क विभागाचे कागदी घोडे
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : शैक्षणिक संस्थेपासून ७५ मीटर अंतरावर बार अथवा इतर मद्यविक्रीच्या दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी मिळत नाही. मात्र, पनवेलमधील कोन गावाजवळ शाळेच्या भिंतीजवळच बार असतानाही विद्यार्थी, पालकांना याच ठिकाणाहून जावे लागत आहे. ‘लोकमत’ने ‘बाबा, बार म्हणजे काय?’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करताच उत्पादन शुल्क विभागाने १४ मार्च रोजी शाळा आणि बारचे अंतर मोजले. ते ८५ मीटर असल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे.
कोन गावाजवळील सेंट झेव्हियर्स इंग्लिश हायस्कूलपासून हाकेच्या अंतरावर गोल्डन नाइट नावाचा बार आहे. सेंट झेव्हियर्स शाळेत नर्सरी ते दहावीचे सुमारे १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, असे असतानाही प्रशासकीय पातळीवर याबाबत ठोस उपाययोजना अथवा कारवाई झालेली दिसून येत नाही. सर्व यंत्रणा मूग गिळून गप्प झाल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी आहे.
बारला क्लीन चिट?
कोन परिसरात २००१ साली सेंट झेव्हियर्स शाळा सुरू झाली. तेव्हा या परिसरात एकही बार अस्तित्वात नव्हता. मात्र, कालांतराने या परिसरात बार सुरू होण्याची मालिका सुरू झाली. अनेक वेळा आंदोलनेदेखील उभी राहिली. सेंट झेव्हियर्स शाळा आणि गोल्डन नाइट बारचे अंतर तपासण्यासाठी उत्पादन शुल्क पनवेल विभागाचे निरीक्षक उत्तम आव्हाड हे आले होते. त्यांनी मोजलेले अंतर ८५ मीटर असल्याने बारला क्लीन चिट मिळणार हे स्पष्ट झाले.
शाळा म्हणते, तक्रार नाही!
सेंट झेव्हियर्स इंग्लिश हायस्कूलचे शाळा प्रशासनदेखील याबाबत उघडपणे भूमिका घेण्याच्या तयारीत नाही. शाळेचे जनसंपर्क अधिकारी व्ही.ए. म्हात्रे यांनी शाळेची बाजू मांडताना बारबाबत शाळा अथवा पालकांची तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. पीटीएमध्ये पालकांच्या बारबाबत तक्रारी प्राप्त नसल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शाळा प्रशासनावर दबाव तंत्राचा अवलंब केला की काय, अशी शक्यता वर्तविण्यात येते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार, शाळेपासून ७५ मीटर अंतरापर्यंत बार अथवा इतर दारूच्या दुकानांना परवाना देता येत नाही. कोन गावाजवळील सेंट झेव्हियर्स इंग्लिश हायस्कूल आणि बार यामधील अंतर ८५ मीटर आहे. - आर.आर. कोळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रायगड.