मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, पनवेलमधील बारापाडा गावात डोंगर खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:19 AM2017-08-20T03:19:39+5:302017-08-20T03:19:40+5:30

अनेक दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बारापाडा गावात डोंगर खचल्याने घराचे मोठे नुकसान झाले.

 Barapada village collapses in Panvel | मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, पनवेलमधील बारापाडा गावात डोंगर खचला

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, पनवेलमधील बारापाडा गावात डोंगर खचला

googlenewsNext

- वैभव गायकर ।

पनवेल : अनेक दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बारापाडा गावात डोंगर खचल्याने घराचे मोठे नुकसान झाले.
गावातील अनेक घरांना डोंगर खचण्याच्या प्रकारामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे माळीणसारखी घटना पनवेल तालुक्यातील डोलघरमध्येही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्र वारी मध्यरात्री ३ वाजल्यापासून सुरू झालेला पावसाचा वेग शनिवारीही कायम होता. त्यामुळे बारपाडा गावात पाणी घुसले.
दुपारनंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. येथील रहिवासी महादेव म्हात्रे यांच्या घरात मातीमिश्रीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. घरातील सदस्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, घराजवळील डोंगराचा काही भाग खचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गावकºयांच्या मदतीने घरातील सामान सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ही घटना दिवसा घडल्याने म्हात्रे कुटुंबीयांना त्वरित मदत मिळाली.
घटनेची माहिती मिळताच, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सर्कल व तलाठी यांना घटनास्थळी पाठविले. या वेळी परिस्थिती नियंत्रणात आली होती. बारापाडा गावची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास आहे. गावात आग्रीपाडा या ठिकाणी ही घटना घडली असून, गावात एकूण २५० घरे आहेत. विशेष म्हणजे, यापैकी जवळ जवळ ३० ते ४० घरांना अशाप्रकारे डोंगर खचण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डोलघर-बारापाडा गावांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे डोलघर-बारापाडा गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क रात्रीपासून तुटला होता. डोलघर गाव उंचीवर असल्याने त्या गावात पुराचे पाणी शिरले नसले तरी बारापाडा, आग्रीपाडा गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. गावातील अनेक घरांत पाणी साचल्याने धान्य तसेच अनेक वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती कर्नाळा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्य निवेदिता कानडे यांनी दिली.

चिरनेरमध्ये पूर, १०० घरांत पाणी
मोठ्या प्रमाणात सुरू झालेली अतिवृष्टी, डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी आणि समुद्राला आलेली उधाण भरतीमुळे चिरनेरला पुराचा तडाखा बसला. सुमारे ८० ते १०० नागरिकांच्या घरात शिरले. मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या पावसाने चिरनेरकरांची त्रेधा तीरपिट उडाली. पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मात्र, जीवितहानी झालेली नाही. आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.

महिन्याभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी पहाटेपासूनच उरण परिसरात पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली. चिरनेर परिसराला झोडपून काढले. गावालगत असलेले ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले. त्यातच डोंगरावरून खाली येणारे पाणीही पुराच्या पाण्यात घुसले. समुद्राला आलेल्या भरतीच्या पाण्याची त्यात भर पडली. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने वाहणाºया ओढे, नाल्यांचे पुरात रूपांतर झाले.

पाणी ओसरण्याचा मार्गच बंद पडल्याने पुराचे पाणी नाल्यालगत असलेल्या चिरनेरवासीयांच्या घराघरांत घुसले. जमिनीपासून चार-सहा फुटांपर्यंत जोते असलेल्या घरांतही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या पूरग्रस्त परिस्थितीला ग्रामपंचायत, नागरिक, महसूल विभाग आणि इतर शासकीय यंत्रणाच अधिक जबाबदार असल्याचा आरोप उरण तहसीलदार गोडे यांनी केला आहे.

नाल्याभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे गोडे यांनी स्पष्ट केले. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही, यासाठी खबरदारीची उपाययोजना आखणे गरजेचेचे झाले असून यासाठी नागरिकांची लवकरच बैठक बोलावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रायगडमध्ये ४८ तासांत अतिवृष्टीची शक्यता
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून ४८ तासांत रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ७ ते १२ से.मी. इतक्या अतिवृष्टीची शक्यता असल्याची पूर्वसूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. या काळात समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच दरडग्रस्त, किनाºयावरील गावांमधील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. पूरस्थिती उद्भवल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी बचाव पथक, साहित्य, रु ग्णवाहिका आदी सुविधा, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत, असे निर्देश दिले आहेत.

पेणमध्ये भातशेती पाण्याखाली
पेण, वडखळ परिसरांतील काही शेती पाण्याखाली गेली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही धिम्या गतीने सुरू असून, पावसामुळे ग्रामीण भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर एसटी वाहतूक व रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे.

बाळगंगा, भोगावती नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
शुक्रवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील भोगावती, बाळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दूरशेत व खरोशी गावांकडे जाण्याचा संपर्क तुटला आहे. पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्याशिवाय अंतोरा, दादर, उर्णोली, सोनखार खाडी तुडूंब भरून वाहत आहेत. पाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता, तालुका प्रशासनाकडून नदी व खाडीकिनारी असणाºया गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बारपाडा गावात डोंगर खचण्याची माहिती मिळताच, तलाठी व सर्कल अधिकाºयांना घटनास्थळी त्वरित पाठविण्यात आले आहे. नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून गावातील इतर घरांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाच्या मार्फत योग्य त्या उपाययोजना राबविल्या जातील.
- दीपक आकडे,
तहसीलदार, पनवेल

Web Title:  Barapada village collapses in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.