मुख्य नाल्याजवळ बॅरिकेड्स लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:34 PM2019-08-08T23:34:55+5:302019-08-08T23:35:01+5:30
नगराध्यक्षांच्या अधिकाऱ्यांना सूचना : कर्जतमधील काही गटारावरील झाकणे तुटली
कर्जत : नगरपरिषद हद्दीतील काही गटारांवरील झाकणे तुटली आहेत, त्यामध्ये गुरे पडण्याचे प्रमाण वाढले आहे तर शाळेजवळील मुख्य नाला बंदिस्त नसल्यामुळे त्यामध्ये विद्यार्थी पडण्याची शक्यता असल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्याने नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी त्याची तातडीने दखल घेतली आहे. शाळेजवळील मुख्य नाला बंदिस्त होत नाही, तोपर्यंत बेरिकेड्स लावण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी सांगितले.
नगरपरिषद हद्दीतील गटारावरील झाकणे तुटली आहेत. अजूनही काही गटारे उघडी आहेत त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा अंदाज न आल्याने उघड्या गटारांमध्ये अनेक गाई पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांना नगरपरिषद कर्मचारी, नागरिकांनी बाहेर काढले. संपूर्ण कर्जत शहराचे पाणी ज्या मुख्य नाल्यातून वाहते त्या नाल्याचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत ठेवले आहे. बाजारपेठ नगरपरिषद यांच्या बाजूने वाहणारा मुख्य नाला अभिनव ज्ञानमंदिर शाळेच्या शेजारून नदीकडे जातो. या नाल्याचे काम हरपुडे यांच्या घरासमोर गेले कित्येक महिने बंद आहे. अभिनव शाळा, शिशुमंदिर, शारदामंदिर, कन्याशाळा, उर्दू शाळा, या शाळांमधील हजारो विद्यार्थी ज्या रस्त्याने चालत जातात, त्या रस्त्यावरील नाला ठेकेदाराला नागरिकांनी सूचना करूनदेखील बंदिस्त केला जात नाही.
शाळेच्या वेळी या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची गर्दी होते. शाळेत जाणारी लहान बालके जीव मुठीत धरून येथून प्रवास करीत असतात. दुर्दैवाने एखाद्या मुलाचा पाय घसरला तर मोठी घटना घडू शकते, या बाबतचे वृत्त ७ आॅगस्टच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची दखल त्याच दिवशी दुपारी घेऊन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी संबंधितांची बैठक घेतली. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या दालनात झालेल्या बैठकीस बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर, नगरसेवक नितीन सावंत, विवेक दांडेकर, प्राची डेरवणकर, लेखा परीक्षक जितेंद्र गोसावी, नगर अभियंता मनीष गायकवाड, नगररचनाकार लक्ष्मण माने, कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक नीलेश चौडीए आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा जोशी यांनी गटारावरील झाकणाची काय परिस्थिती आहे, अशी विचारणा करून फायबरची झाकणे काढून टाका आणि त्या ठिकाणी लोखंडी झाकणे टाकण्यात यावी अशी सूचना केली. त्यावर नगर अभियंता मनीष गायकवाड यांनी एकूण ३२ ठिकाणी झाकणाची आवश्यकता आहे त्याची आॅर्डर दिली आहे, असे सांगितले. बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर यांनी मुख्य रस्त्याच्या बाजूला हेवी झाकणे लावावीत, असे सांगितले. त्यावर कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक नीलेश चौडीए यांनी, गटार साफ करताना व्हेवी झाकण उचलण्यास त्रास होतो, असे सांगितले. नगराध्यक्षा जोशी यांनी मुख्य गटारावरील सॅल्ब बाबत विचारणा केली असता निलेश चौडीए यांनी, हरपुडे कामात अडथळा आणतात असे सांगितले. सॅल्ब टाके पर्यंत संबंधित ठेकेदाराला बेरिकेड्स लावण्यास सांगाव्यात, अशा सूचना दिल्या.