करंजा बंदर उभारणीत निधीचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:54 AM2019-12-22T01:54:48+5:302019-12-22T01:55:07+5:30
काम रखडण्याची शक्यता । दिरंगाईमुळे ८६ कोटींच्या खर्चाचे काम पोहोचले २३६ कोटींवर
मधुकर ठाकूर
उरण : राज्यातील मच्छीमारांसाठी मुंबई येथील ससून डॉक बंदरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे अद्ययावत, अत्याधुनिक बंदर उभारण्यात येत आहे. पश्चिम किनाऱ्यावरील या बंदरात एक हजार मच्छीमार बोटी लॅण्ड होण्याच्या क्षमता राहणार असून निधीअभावी गेल्या सात वर्षांपासून बंदराचे काम संथगतीने सुरू आहे.
सुरुवातीच्या बंदर उभारणीसाठी ८६ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली होती. मात्र अतिरिक्त वाढते काम आणि तांत्रिक अडचणींमुळे २०१९पर्यंत खर्चात आणखी १५० कोटींची भर पडून ते २३६ कोटींपर्यंत पोहोचले आहे. अतिरिक्त १५० कोटींची रक्कम केंद्र व राज्य सरकार मिळून निम्मी-निम्मी देण्याची घोषणा करून त्यास मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र यापैकी फक्त ४६.३० कोटींचाच निधी प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधीनंतर करंजा बंदर उभारणीच्या कामाला वेगाने सुरुवात झाली. मात्र महाराष्ट्रात नव्याने आलेले राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे उर्वरित रक्कम मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
मात्र गेल्या सात वर्षांपासून निधीअभावी रखडत चाललेले बंदराचे काम आणखी रखडण्याची भीती मच्छीमार आणि व्यावसायिकांनाही वाटू लागली आहे.
मुंबईत मच्छीमारांसाठी ससून डॉक आणि भाऊचा धक्क्याजवळील कसारा बंदर (न्यू फिश जेट्टी ) अशी दोन बंदरे आहेत. कसारा बंदर आधीच गुजराती मच्छीमारांसाठी सरकारने आंदण देऊन टाकले आहे. त्यामुळे मुंबई, रायगड, ठाणे या तीन जिल्ह्यांतील हजारो मच्छीमारांसाठी मुंबईतील ससून डॉक हेच एकमेव बंदर उरले आहे. तिन्ही जिल्ह्यांतील हजारो मच्छीमार बोटी ससून डॉक बंदराच्या आश्रयाला येतात. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी ससून डॉक बंदरातच डिझेल, बर्फ आणि इतर आवश्यक साधनसामग्री बोटीत भरण्यात येते. मासेमारी करून परतल्यानंतर याच बंदरात मासळी उतरवितात. लिलाव करून विक्री करतात.
ससून डॉक बंदराची ७०० मासेमारी बोटी लागण्याची क्षमता आहे. मात्र अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने मुंबई, रायगड, ठाणे या तीन जिल्ह्यांतील हजारो मच्छीमार बोटी ससून डॉक बंदरात लँड होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने ससून डॉक बंदरात मच्छीमार बोटी येत असल्याने मोठी गर्दी होते. यामुळे बंदरावर मोठा ताण पडत असल्याने मच्छीमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
ससून बंदरावरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा बंदरात अद्ययावत, सर्व सोयींयुक्त आधुनिक बंदर उभारण्यात यावे, अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात होती. या मागणीसाठी करंजा मच्छीमार संस्थेने राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शासनानेही मच्छीमारांच्या मागणीची दखल घेऊन करंजा खाडीकिनारी एक हजार मच्छीमार बोटी लागण्याच्या क्षमतेचे अत्याधुनिक बंदर उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. करंजा बंदराचे दोन टप्प्यात काम करण्यात येणार होते. पहिल्या टप्प्यातील २५० मीटर लांबीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र समुद्राच्या तळाशी अवघड खडक लागल्याने ते रखडले होते. खडक फोडून बंदर उभारणीसाठी अतिरिक्त १५० कोटी खर्च शासनाकडून वेळेत उपलब्ध होऊ शकला नाही.
करंजा मच्छीमार बंदराचा विस्तार आणि मच्छीमार बांधवांचा विकास झाला पाहिजे, यासाठी करंजा मच्छीमार संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शिवदास नाखवा, माजी अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी जेएनपीटीचे तत्कालीन विश्वस्त तथा विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या मदतीने केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सागरमाला योजनेतून ७५ कोटी रुपये व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ७५ कोटी रुपये असा एकूण १५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करंजा-उरण येथील जाहीर सभेत केली. त्यामुळे २०१८ मध्ये रखडलेल्या करंजा मच्छीमार बंदराच्या विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला.
25,000
नागरिक, व्यावसायिकांना मिळणार रोजगाराची संधी
च्सहाशे मीटर लांबीच्या करंजा बंदरात आधुनिक फिश लॅडिंग जेट्टी, वेस्टवॉटर ट्रिटमेंट प्लाण्ट, रेडिओ अॅॅण्ड कम्युनिकेशन सेंटर, फिश प्रोसेसर, शीतगृह, मासळी लिलाव आणि विक्री केंद्र, इंधनासाठी डिझेल पंप, इत्यादी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली होती.
च्या बंदरावर आधारित छोटे-मोठे अनेक उद्योग- व्यवसाय परिसरात उभे राहणार आहेत. यामुळे २५ हजार नागरिक, व्यावसायिकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. बंदराचे काम पूर्ण झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बोटी मुंबईच्या ससून डॉक बंदराऐवजी करंजा बंदरात लॅण्ड होतील.
निधीअभावी रखडलेल्या करंजा बंदराचे काम लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि करंजा मच्छीमार संस्था कामासाठी सर्वतोपरी मदत, प्रयत्न करीत आहेत. बंदराच्या कामासाठी विलंब होणार नाही, पुन्हा थांबणार नाही याची दक्षता शासन घेईलच अशी अपेक्षा आहे.
- भालचंद्र कोळी, अध्यक्ष, करंजा मच्छीमार संस्था