- दत्ता म्हात्रे
पेण : नेहमीच येतो उन्हाळा आणि पाण्यासाठी धावपळ करा, अशी पेण खारेपाटातील २९ गावे ४३ वाड्यांची स्थिती आहे. येथे नेहमीप्रमाणे पाणीटंचाईची गंभीर समस्या यावर्षीही कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. वाशी खारेपाट व वडखळ विभागातील मसद-शिर्डी विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापाडा धरणाच्या पाणीपातळीने तळ गाठला आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शहापाडा धरणात असून, यानंतर खारेपाटातील २९ गावे ४३ वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट येणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दोन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले असून, टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी देण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर्षी उन्हाचे चटके फेब्रवारीमध्येच जाणवू लागल्याने पाण्यासाठी प्रशासनाला काटेकोर नियोजन करून पावले टाकावी लागतील.
पेणच्या शहापाडा धरण्याची पाणीक्षमता कमी असल्याने जुलै ते फेब्रुवारी अशा नऊ महिन्यांत हे धरण तळ गाठते. यामध्ये महत्त्वाचा भाग असा की, पावसाचे चार महिने, हिवाळ्यातील तीन महिने वापराचे पाणी तलाव, विहिरीद्वारे मिळत असल्याने शहापाडा नऊ महिन्यांपर्यंत टिकाव धरते. आता वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता या धरणात हेटवणे धरणाचे पाणी आणण्याची ३० कोटी निधीची योजना असून तिचे काम सुरू आहे.
ठेकेदार कंपनीकडून केले जाणारे योजनेचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे, यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. १५ फेबु्रवारीपर्यंत या योजनेचे पाणी वाशी खारेपाटातील सात ग्रामपंचायतींना मिळावे म्हणून हे काम सुरू करताना सर्वच राजकीय पक्ष कार्यकर्ते व नेतेमंडळींनी गाजावाजा करून पोस्टरबाजी, बॅनर झळकावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. आता शहापाडा धरणात कालव्याद्वारे येणारे हेटवण्याचे पाणी घेतले जाते. मात्र, त्यातून खारेपाटाची तहान भागणार नाही.
मुळातच महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने या योजनेचे उत्तरदायित्व घेतल्याने टंचाईच्या झळा जेव्हा लागतील, तेव्हा पाण्यासाठी वणवण भटकणाºया महिलांच्या रोषाला या अधिकाºयांना यावर्षी सामोरे जावे लागेल. या वर्षी पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी येथील जनतेची धारणा होती. मात्र, ३० कोटी योजनेचे काम करणारा ठेकेदार पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने, यंदा ही पाणीटंचाईची समस्या पाठ सोडणार नसल्याचे चित्र खारेपाटात आहे.पाणीटंचाईसाठी पंचायत समितीला करावी लागणार उपाययोजनाच्शहापाडा धरण परिसरात या योजनेचे दोन जलकुंभ बांधण्याचे काम सुरू आहे, येत्या पावसाळी हंगामापर्यंत ते पूर्ण होईल. त्याचबरोबर शहापाडा धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचे, पाणीपुरवठा लाइनच्या विस्तारीकरणाचे कामे सुरू करण्यासाठी मात्र वेळ लागणार आहे. मेन पाणीपुरवठा योजनेच्या कामांची खोदाई व पाइप टाकण्यासाठी मे महिना उजाडणार आहे, त्याअनुषंगाने ३० कोटींच्या पाणी योजनेच पाणी यावर्षी टंचाई काळात उपलब्ध होणार नसल्याने मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यात शहापाडा धरणाला घरघर लागणार आहे. या वर्षातही खारेपाटातील पाणीटंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवणार आहेत, त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी मार्च प्रारंभापासून पेण पंचायत समिती प्रशासनाला करावी लागणार आहे.