आमदार राजन साळवी उद्या राहणार चौकशीला हजर; रायगड लाचलुचपत विभागाने पाठवली होती नोटीस
By राजेश भोस्तेकर | Published: December 13, 2022 07:37 PM2022-12-13T19:37:08+5:302022-12-13T19:37:39+5:30
लाचलुचपत विभागाने पाठवलेल्या नोटीसवरून आमदार राजन साळवी उद्या राहणार चौकशीला हजर राहणार आहेत.
अलिबाग : राजापूरचे आमदारराजन साळवी हे उद्या बुधवारी १४ डिसेंबर रोजी रायगड लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात चौकशीला हजर राहणार आहेत. सोमवारी १२ डिसेंबर रोजी हजर राहणार होते मात्र वयक्तिक कारणामुळे ते हजर राहू शकले नव्हते. आज सकाळी ११ वाजता हजर राहून चौकशीला सामोरे जाणार आहेत.
राजापूरचे ठाकरे गटाचे आमदारराजन साळवी यांना रायगड लाच लुचपत विभागाने मालमत्तेच्या उघड चौकशीला हजर राहून जबाब नोंदविण्याबाबत २ डिसेंबर रोजी नोटीस पाठवली होती. सोमवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालमत्तेची कागदपत्र घेऊन हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आमदार राजन साळवी हे ५ डिसेंबरला चौकशीला गैरहजर राहिले होते. पंधरा दिवसांनी हजर राहणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.
त्यानुसार सोमवारी १२ डिसेंबर रोजी आमदार साळवी हे रायगड लाच लुचपत कार्यालयात येणार होते. मात्र घरातील सदस्याचा मृत्यू झाल्याने ते हजर राहिले नव्हते. बुधवारी १४ डिसेंबर रोजी आमदार साळवी हे चौकशीला सामोरे जाणार आहेत. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.