अलिबाग : महाड तालुक्यातील खर्डी गावात शनिवारी आयोजित स्वातंत्र्यदिन विशेष ग्रामसभेत हाणामारी झाली.खर्डी गावातील ग्रामसभेत वनराई संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या तथाकथित पाणलोट विकास योजनेच्या अमंलबजावणीत झालेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचारप्रकरणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल करणारे ग्रामस्थ शेतकरी संदेश महाडिक व अन्य तक्रारदार ग्रामस्थ शेतकरी यांना खर्डी पाणलोट विकास समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी संदेश महाडिक यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर संदेश महाडिक व अन्य ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची कुणकुण लागताच खर्डी पाणलोट विकास समितीचे अध्यक्ष व सदस्यांच्या गटाने संदेश महाडिक व अन्य शेतकऱ्याविरुद्ध महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वातंत्र्यदिनी गावात होणाऱ्या विशेष ग्रामसभेत आमच्यावर हल्ला करून मारहाण होण्याची शक्यता असल्याची पूर्वकल्पना देणारे निवेदन शुक्रवारी रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, महाड उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड तालुका पोलीस ठाणे यांना दिले होते. मात्र पोलिसांकडून कोणतेही दक्षतेचे उपाय करण्यात आले नाहीत. परिणामी ग्रामसभेत आम्हाला मारहाण करण्यात आल्याचे संदेश महाडिक यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
खर्डी ग्रामसभेत हाणामारी
By admin | Published: August 16, 2015 11:40 PM