ब्लॅक स्पॉट शोधून प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 02:53 AM2017-10-26T02:53:46+5:302017-10-26T02:53:50+5:30
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण भागात जाणारे रस्ते यावर होणारे अपघात टाळण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून काढून, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी दिले आहेत.
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण भागात जाणारे रस्ते यावर होणारे अपघात टाळण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून काढून, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पासरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, राष्ट्रीय महामार्ग महाड विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. सुरवसे, वाहतूक पोलीस शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक मनोजकुमार म्हात्रे, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. गतिरोधकांना रंग लावा, साइडपट्ट्या भरून घ्या.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट बाबत उपाययोजना करण्यासाठीच्या निधीची तरतूद, अंमलबजावणीचे वेळापत्रक अंमलबजावणीसाठी जबाबदार अधिकारी यांची निश्चिती करावी. या वेळी जिल्ह्यातील रस्त्यावर असलेल्या अधिकृत व अनधिकृत गतिरोधकांचाही आढावा घेण्यात आला. अपघात कमीत कमी होण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी गतिरोधक तयार केले आहेत. त्या गतिरोधकांना रंग लावून ते चालकाच्या लक्षात येतील, अशी व्यवस्था करावी तसेच रस्त्यांच्या बाजूच्या साइडपट्ट्या भरून घ्याव्यात, जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल, असेही निर्देश त्यांनी पुढे दिले. जिल्ह्यातील सर्व गतिरोधकांचा सविस्तर तालुकानिहाय आढावा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. खड्डेमय रस्ते दुरुस्तीकरिता जबाबदार असणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र या महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर होते.
>रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत बोलताना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी दिसत आहेत तर शेजारी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व अन्य अधिकारी.