अलिबाग : कमीत कमी सुविधा, कमी पगार आणि जास्तीत जास्त काम करून चांगली सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. अविरत ७१ वर्षे प्रवासी सेवा देणाºया एसटीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त करून, येत्या विधानसभा अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील सर्व एसटी बस स्थानके सुसज्ज करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन आ. पंडित पाटील यांनी दिले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (एसटी) वर्धापनदिनानिमित्त अलिबाग एसटी आगारात आयोजित समारंभात आ. पंडित पाटील बोलत होते. या वेळी रायगड एसटी विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के, अलिबागच्या उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, नगरसेविका वृषाली ठोसर, सभापती संजना किर, नगरसेवक अनिल चोपडा, महिला आघाडी सेनेच्या प्रमुख कल्पना पाटील, अलिबाग आगार व्यवस्थापक चेतन देवधर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पतंगराव कदम महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी एसटी खेड्यात नेली. माजी राज्यमंत्री मोहन पाटील, भाई शेटये यांनी प्रयत्न करून स्थानिकांना एसटीमध्ये कामाला लावले. एसटी सामाजिक काम जास्त करते. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अपंग यांना प्रवास भाड्यात सवलती देते. जनतेचा एसटीवर मोठा विश्वास असून आजही पहिली पसंती तीच असल्याचे ते म्हणाले.
या वेळी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे म्हणाल्या, सुखरूप प्रवाशाची हमी एसटीच घेऊ शकते. विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के म्हणाल्या, हिरकणी, विठाई, शिवशाही, अश्वमेध सारख्या बससेवा देणाºया एसटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक होते. रायगड जिल्ह्याचा भारमानात पहिला क्र मांक होता. मात्र, काही कारणामुळे उत्पन्नात घट झाली असून पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर एसटीला आणायचे आहे. त्यासाठी सर्व कर्मचाºयांनी सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण लाइफलाइनएसटी ही सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. एस टी महामंडळाने स्थापनेपासून समाजसेवेचे व्रत अंगीकारले आहे. ऊन, वारा, पाऊस सदैव एसटीची सेवा सर्वसामान्य माणसाला उपलब्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी जनतेची निस्पृह सेवा करत आहे, असे जयराज सूर्यवंशी यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जयराज सूर्यवंशी यांनी एसटी कामगारांशी संवाद साधला.