समुद्रकिनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्सला सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मार्गदर्शक सूचनांवर स्वाक्षरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 12:52 AM2020-12-20T00:52:47+5:302020-12-20T00:53:11+5:30
water sports : महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मार्गदर्शक सूचना प्रदर्शित न झाल्यामुळे हे खेळ बंद केले होते. याबाबत अनेक स्थानिक युवकांनी लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केली होती.
मुरुड जंजिरा : मुरुड सह अनेक समुद्र किनाऱ्यांवरील वॉटर स्पोर्ट्स बंद केल्याने स्थानिक लोकांच्या रोजगारावर गदा आल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता, पण शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसओपीवर स्वाक्षरी केल्यामुळे शनिवारपासून वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे प्रतिपादान स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे.
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मार्गदर्शक सूचना प्रदर्शित न झाल्यामुळे हे खेळ बंद केले होते. याबाबत अनेक स्थानिक युवकांनी लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे, या प्रश्नाबाबत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत खेळ सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांचा प्रस्ताव (एसओपी) बनवण्यात आला व तो तातडीने मुख्यमंत्र्यांकडे स्वाक्षरी साठी पाठविण्यात आला. रायगडचे खासदार सुनील तटकरे व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या सहकार्यातून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे सदरची स्वाक्षरी झाली असल्याने वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे प्रतिपादान स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला असून पर्यटनाला हातभार मिळणार आहे.