माणगाव : इंदापूर (तळाशेत) ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची झाली असून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली. या निवडणुकीचा निकाल सोमवारी २५ फेब्रुवारी रोजीलागला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षातर्फे सायंकाळी विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी या दोन गटांमध्ये सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान हाणामारी घडली. यात पोलिसांनी हस्तक्षेप केला असता या दोन्ही गटांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून,तसेच हाणामारीमुळे दोन्ही गटातील जवळपास २७ जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या विजयी उमेदवारांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून मिरवणुकीत डी.जे. लावून ध्वनिप्रदूषण केले. तसेच गैरकायद्याने मंडळी जमवून या मिरवणुकीत शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी दिलेल्या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून विनायक अनंत सुर्वे यांनी फिर्यादी चन्नप्पा रामचंद्र अंबरगे (व्यवसाय नोकरी माणगाव पोलीस ठाणे) यांची मान पकडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा निर्माण के ला. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून अंबरगे यांच्या मनगटी घड्याळाचे नुकसान केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मारामारी केली म्हणून गुन्हा दाखल केला.
या हाणामारीमध्ये सहा.पोलीस निरीक्षक एस.बी.गायकवाड, पो.ह.म्हात्रे, पो.ना.अंबरगे, होमगार्ड सुशील वाटवे (सर्व माणगाव पोलीस ठाणे) हे जखमी झाले आहेत. उदय अधिकारी, दिनेश महाजन, महेश ऊर्फ पिंट्या महाजन, अनिल नवगणे, महेश दिघे, नीलेश दत्ताराम नवगणे, नवीन मालोरे, रोहित म्हस्के, तुषार दळवी, अल्पेश म्हस्के, नथुराम दिघे, विनायक सुर्वे, जयदीप देशमुख, संदेश सांगवेकर, जीवन बंगाल, घनश्याम अधिकारी, सुजित अनंत या १७ जणांना अटक करण्यात आली.पोलीस तपास सुरूमुकेश करंजकर, संतोष भोईर, अभय मोरे, नामदेव पांडुरंग जाधव, संदेश शांताराम मालोरे, स्वयंम मुकेश करंजकर, राजेश दळवी, रणजीत मालोरे, दत्ताराम नवगणे, जीवन बंगाल या १०आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाही. सर्व आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये, तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत.