कर्जत : उल्हास नदीकिनारी घाटा लगतच्या जागेवर नगर परिषद प्रशासन काँक्रीटीकरण करणार असल्याने त्या ऐवजी या जागेवर लॉन तसेच शोभिवंत झाडे लावून सुशोभीकरण करावे जेणे करून नागरिकांना त्यामुळे सुखद आनंद मिळेल, अशी मागणी समीर सोहोनी या स्वच्छतादूताने नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेकडे केली आहे. त्याअनुषंगाने आमदार सुरेश लाड आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी घाटाची पाहणी केली.
शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात थेट सांडपाणी सोडण्यात येत असल्याने तसेच कचरा टाकण्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले असून त्यामुळे जलपर्णीची सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचीच दखल घेऊन शहरातील समीर सोहनी आणि मुकुंद भागवत यांनी पुढाकार घेऊन नदी स्वच्छता अभियान मागील तीन महिन्यापासून सुरु केले आहे. त्यात त्यांना काही प्रमाणात यश आले असून काही भाग स्वच्छही झाला आहे. घाट परिसरातील कचºयाची विल्हेवाट लावून तो परिसराचे सपाटीकरण केले आहे आणि याच जागेवर नगर परिषद साबरमती घाट पद्धतीच्या पायºया बनविण्याच्या विचारात आहे मात्र या पायºया करण्यापेक्षा शोभिवंत झाडे लावून सुशोभिकरण करावे अशी मागणी केली समीर सोहोनी आणि मुकुंद भागवत यांनी केली आहे.
नगर परिषद स्वच्छता विभागाचे कर्मचारी कचरा नियमितपणे संकलित करीत आहे. तरी सुद्धा काही नागरिक गाडीवरून पटकन नदीपात्रात कचरा फेकून देतात. त्यावर अंकुश लावण्यासाठी सीसीटीव्ही नदी घाट परिसरात बसविणार आहोत. समीर सोहोनी आणि मुकुंद भागवत यांचे काम कौतुकास्पद आहे. - रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद
नदीपात्राला जलपर्णीचा विळखा पडला आहे. घाट परिसरात तळीराम पार्ट्या करीत असल्याने दारूच्या बाटल्यांच्या खच पडला होता तो आम्ही साफ केला. याच घाट परिसरात वृक्ष लावून सुशोभीकरण केल्यास नागरिकांना आनंद घेता येईल. - समीर सोहोनी, स्वच्छतादूत , कर्जत
भुयारी गटारे झाली नसल्याने शहराचे सांडपाणी थेट पाणी नदीत जाते त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. या संदर्भातला प्रस्ताव मागील सात आठ वर्षांपासून प्रलंबित आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. नदीलगतच्या किनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. - सुरेश लाड, आमदार