- जयंत धुळप
अलिबाग - गृध्राद्य पक्षीकुळातील एक शिकारी पक्षी समुद्र गरुड हा अत्यंत देखणा पक्षी इंग्रजी मध्ये त्यास Whitebellid sea eagle म्हणून तर हिंदी मध्ये कोहासा, समुद्री उकाब, संपमार अशा नावाने आेळखले जाते. मात्र अलिकडच्या १५ ते २० वर्षांत या समुद्र गरुडांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने पर्यावरण व पक्षी अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच वेळी रायगडच्या सागरी किनारपट्टीत या समुद्र गरुडांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने या किनारपट्टीतील समुद्र गरुड वास्तव्याकरिता आवश्यक निसर्ग आणि पर्यावरण चांगले आहे,यावर अनाहूतपणे शिक्का माेर्तब हाेत आहे.समुद्र किनारी आढळतात समुद्र गरुड दाम्पत्ये
समुद्र गरुड हा घारीपेक्षा आकाराने मोठा पक्षी आहे. याचा रंग वरून करडा असतो .डोके ,मान व खालचा भाग पांढरा शुभ्र असतो .तर शेपटीच्या टोकाचा भाग पांढरा शुभ्र असतो .उडताना पांढऱ्या पंखांखालची काळया किनारीमूळे या पक्ष्याची ओळख पटते .हा पक्षी आकाशात उडताना पाठीवरच्या पंखांचा आकार इंग्रजी V या अक्षरासारखा दिसतो .यामध्ये नर-मादी दिसायला सारखे असतात .हे समुद्र –किनाऱ्यावर एकटे किवा जोडीने आढळून येतात. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीत अस्तित्व
मुंबई पासून दक्षिणेस पश्चिम किनारा आणि पूर्व किनाऱ्र्यावरील बांगला देशात समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश आणि किनाऱ्यापासून काही अंतरावर हे समुद्र गरुड आढळतात .श्रीलंका ,लक्षद्विप, अंदमान आणि निकोबार बेटे ,तसेच गुजरात मध्ये ते दिसतात .दक्षिण भारतात नोव्हेंबर -मार्च तर उत्तरेकडे जानेवारी ते एप्रिल या काळात समुद्र गरुड आढळतात.
दहा वर्ष जूनी घरटी, एकाच घरट्यात अनेक वर्ष राहाण्याची मानसिकता
मासे हेच प्रमुख खाद्य असणारे हे सागरी गरुड समुद्र किनारी असलेल्या उंच सुरुं, पिपळ,वड आदि झाडांवर घरटी करुन राहातात. रेवदंडा ते मुरुड या सागरी किनारपट्टीत एकूण आठ सागरी गरुड दाम्पत्यांची घरटी असून ती किमान १० वर्षांपासून असल्याचे निरिक्षण पक्षी अभ्यासक आणि फाॅरेस्ट राऊंड आॅफीसर हरिश्चंद्र नाईक यांनी लाेकमत शी बाेलताना सांगीतले. समुद्र गरुड दाम्पत्याचा स्वभाव एकाच घरट्यांत अनेक वर्ष वास्तव्य करण्याचा असताे. अलिबाग येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या जागेत समुद्र किनारी अशाच प्रकारचे समुद्र गरुड दाम्पत्याचे असलेले घरटे किमान २० वर्षांपासून आहे.
वातावरणाचे पूर्वसंकेत देणारे सागरी गरुड
सागरातील बदल, वातावरणातील बदल, पावसाचे संकेत या सागरी गरुडांच्या वावरण्यावरुन बांधले जातात. काेळीबांधवांना वातावरणाचे पूर्वसंकेत देण्यात समुद्र गरुड माेठी महत्वाची भूमीका बजावीत असतात. समुद्र गरुडांची अस्तीत्वात असलेली घरटी सरक्षीत करण्याकरीता प्रयत्न झाले पाहीजेत अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली आहे.