लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झाले आहेत, असे विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी येथे केले. एकाने पत्नी आत्महत्या करेल, दुसऱ्याने राजीनामा देतो, तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील, अशी गळ तीन आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घातली. त्यामुळे पेचात पडलेल्या मुख्यमंत्र्यांना संबंधित आमदारांना मंत्रिपद द्या असे सांगून मी आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहिल्याची खंत आमदार भरत गोगावले यांनी बोलून दाखवली.
अलिबाग तालुक्यातील खानाव येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी बुधवारी आमदार गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना आमदार गोगावले यांनी आपली खंत व्यक्त केली, तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. जनतेची सेवा करा, रात्री-अपरात्री कोणाचा फोन आल्यास टाळू नका, असा सल्लाही आमदार गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिला.
अनंत गोंधळी यांच्या पक्ष प्रवेशाने या परिसरातील असलेला शेकाप ही संपत आला आहे. उसर येथील गेल, एचपी कंपनीत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या भाषणातून दिली. उमटे धरणासाठी १४१ कोटी निधी मंजूर केला आहे. तर सांबर कुंड धरणासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे यावेळी आमदार दळवी यांनी म्हटले आहे.
लोक आमच्यासोबत
रायगड जिल्ह्यातून अनेक दिग्गज पुढील काळात शिवसेनेत येत आहेत. अलिबाग तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी दीडशे कोटी दिले. आधीच्या आमदारांनी विकासकामे केली नाहीत. त्यामुळे आज शेकाप संपत चाललेला पक्ष आहे. आम्ही जनतेची सेवा करीत असल्याने लोक आमच्या सोबत आहेत, असे गोगावले म्हणाले.